चिपळूण : ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्ल्यांची देखभाल करणाऱ्या इतिहासप्रेमींच्या पाठीवर किमान कौतुकाची थाप मारली पाहिजे, अशी अपेक्षा निसर्ग अभ्यासक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केली.

चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाने अप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्राचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या सहकार्याने ‘अपरान्तायन’ ही दृक्श्राव्य मालिका सुरू केली आहे. बुधवारी (दि. ९ मार्च) तिसऱ्या दिवशी ‘किल्ल्यांची देहबोली’ या विषयावर श्री. वाटेकर यांच्याशी मसाप चिपळूण शाखेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध कथाकार प्रा. संतोष गोनबरे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. वाटेकर म्हणाले, ऐतिहासिक किल्ल्यांची देहबोली भटक्यांना आकर्षित करते. लहानपणापासूनच इतिहासाचा अभ्यास करताना ते ठिकाण आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. अफझलखानाचा वध झाला तो प्रतापगड आपण पाहिला नसेल, पण प्रभावी पद्धतीने शिकविले गेले, तर किल्ल्याचे चित्र दिसते. इतिहास जाणवतो. एक फ्रेम तयार होते. नंतर त्याबाबतचे वाचन, वक्त्यांची, संशोधकांची भाषणे, वृत्तपत्रांमधील लेख, वेगळ्या पद्धतीने छायाचत्रकारांनी काढलेली छायाचित्रे हे सारे पाहून आपल्यातील कुतूहल जागृत होते. त्यातूनच आपण ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी प्रवृत्त होतो.
ऐतिहासिक वास्तूंचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याबाबतचा प्रश्न विचारला असता श्री. वाटेकर म्हणाले, पर्यटनाच्या विकासासाठी म्हणून किल्ल्यांवर पेव्हर ब्लॉक बसवणार असू, तर ते योग्य नाही. तसे केले तर ते बागेत फिरायला गेल्यासारखे होईल. किल्ला हा किल्ल्याचाच फिल देणारा हवा. बाग ही बाग हवी. भेद समजून घेतला पाहिजे. किल्ल्यावर गाजविले गेलेले शौर्य, बलिदान, तेथील इतिहास लक्षात घेऊन किल्ल्यांचे पर्यटन केले पाहिजे. किल्ल्यांच्या डागडुजीसाठी शासनाला जे करायचे ते शासन करीलच. पण आपण काय करायचे, मी काय करणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तो कृतिशील कार्यकर्त्यांनाच पडतो. सुदैवाने ठिकठिकाणची मंडळे, विद्यार्थी त्या त्या ठिकाणी किल्ल्यांची स्वच्छता, जोपासनेसाठी प्रयत्न करतात. मुंबईतील काही मंडळेही असे काम करत असून ते काम दखलपात्र आणि कौतुकास्पद आहे. त्यांच्या पाठीवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी कौतुकाची थाप मारली पाहिजे. राष्ट्रीय सणांच्या दिवशी अशा कार्यकर्त्यांन एकत्र बोलावून त्यांच्या कामाचे कौतुक केले पाहिजे. गावातील ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे, सुशोभीकरणाचे काम अनेक तरुण पदरमोड करून करत असतात. त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांची ऊर्जा वाढवण्याचे काम करायला हवे, अशी अपेक्षाही श्री. वाटेकर यांनी व्यक्त केली.
श्री. धीरज वाटेकर यांच्याशी साधलेला संवाद सोबतचा व्हिडीओमध्ये पाहता येईल.

