कोकणातील कलाकारांची संगीतसाधना एकलव्यासारखी : डॉ. गजानन रानडे

रत्नागिरी : शंभर वर्षांपेक्षा संगीत नाटकांची परंपरा जपणाऱ्या कोकणातील कलाकारांची साधना एकलव्यासारखी आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. गजानन रानडे यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या हीरक महोत्सवी संगीत नाट्य स्पर्धेचे उद्घाटन काल (दि. १० मार्च) रत्नागिरीत झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, विशाल समुद्रकिनारा लाभलेल्या कोकणात विशाल हृदयाचे, मेहनत करणारे कलाकार आहेत. कोकणात पूर्वीपासूनच कलाकार निर्माण झाले आहेत. आजही होत आहेत. कोकणात पूर्वी संगीताचे शिक्षण शिक्षणाची संधी नव्हती. तरीही १०० वर्षांपूर्वीपासून गावागावांमध्ये होणाऱ्या उत्सवांमध्ये संगीत नाटकच करायचे, असा आग्रह असायचा. ही परंपरा आजपर्यंत जपली आहे. कोकणातील पूर्वीच्या त्या कलाकारांनी एकलव्यासारखी आराधना केली. आज संगीचे मार्गदर्शन रत्नागिरीत उपलब्ध झाले आहे, पण तेव्हा रेकॉर्ड ऐकणेही शक्य नन्हते. रेडिओसुद्धा गावात एखाददुसराच असायचा. अशा स्थिती ऐकून ऐकून कलाकारांनी अभ्यास केला आणि संगीत परंपरा जिवंत ठेवली. रत्नागिरीजवळच्या कुर्धे गावातील पं. गणेशबुवा बेहेरे पुण्यात जाऊन शिकले. त्यामुळे किराणा घराण्याला थोर गायक मिळाला. त्यांना राष्ट्रपती पदकही मिळाले. त्याच गावातील एस. के. अभ्यंकरही तसेच शिकले. ते आकाशवाणीवरही होते. त्यांनी नावलौकिक मिळविला. त्यासाठी भरपूर कष्ट केले. भरपूर मेहनत केली. कोकणातील कलाकारांना योग्य ती संधी मिळाली, तर ते कष्ट करायला कमी पडत नाहीत, हेच त्यातून दिसते. ही परंपरा पुढेही सुरू राहील, यात शंका नाही, असेही ते म्हणाले.

उद्घाटन समारंभाला अ. भा. नाट्य परिषदेचे सदस्य भाग्येश खरे, परीक्षक मुकुंद मराठे, अर्चना साने, विलास कुडाळकर, ज्ञानेश पेंढारकर आणि विजय कुलकर्णी उपस्थित होते.

रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ही स्पर्धा सुरू झाली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील १६ संस्थांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. येत्या २७ मार्चपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. उद्घाटनाच्या रात्री रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विदयार्थी सहायक मंडळाने कट्यार काळजात घुसली हे नाटक सादर केले.

डॉ. गजानन रानडे यांचे भाषण सोबतच्या व्हिडीओमध्ये

स्पर्धेचे वेळापत्रक

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply