कोकण मराठी साहित्य परिषदेला मरगळ : अॅड. विलास नाईक

वातानुकूलित सभागृहत रंगले पहिले पोपटी संमेलन

पनवेल : कोकण मराठी साहित्य परिषदेत आता ऊर्जा राहिलेली नाही. त्यात आता वशिल्याने खोगीरभरती केल्याने पद्मश्री मधूभाई कर्णिक यांच्या हेतूलाही काळिमा फासला जात असल्याने कोमसापमध्ये मरगळ आली आहे, अशी टीका समीक्षक अॅड. विलास नाईक यांनी केली.

कांतीलाल प्रतिष्ठान आणि पनवेल संघर्ष समितीने ज्येष्ठ विधीतज्ज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक अॅड. विलास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे पोपटी कविसंमेलन पनवेलजवळील आकुर्ली येथील काकाजींनी वाडीमध्ये आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. कोकणात साहित्य क्षेत्रात अनेक हिरे आहेत. काहींची पाच ते दहा दर्जेदार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना बाजूला करून ज्यांना साहित्यातील ‘सा’सुद्धा कळत नाही, अशांना आयत्या बिळावर रेघोट्या ओढायला बसविल्याने साहित्य क्षेत्राची हानी होत आहे, असे मतही नाईक यांनी व्यक्त केले.

संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून कवी, गीतकार आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे, आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तिकुमार दवे आणि चित्रपट निर्माते राम मलिक उपस्थित होते.

रायगड जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेल्या वालाच्या शेंगांची विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेली चविष्ट पोपटी आणि राज्याच्या कानाकोपर्‍यातून उत्स्फूर्तपणे सामील झालेले कवी, शाहीर यांनी ‘स्वाद पोपटीचा, आस्वाद कवितेचा’ हा आगळा वेगळा कार्यक्रम अजरामर केला. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीच्या पोपटी संमेलनाला छेद देत आलिशान वातानुकूलित, रंगबेरंगी विद्युत रोषणाईची शाल पांघरलेल्या लख्ख प्रकाशाच्या सभागृहात ही मैफिल सजली होती.

मळलेल्या वाटेतून न जाता स्वतःची वेगळी पायवाट तयार करून ती समाजाला समर्पित करण्याची वृत्ती जोपासणार्‍या कांतीलाल प्रतिष्ठानने पोपटी संमेलनसुद्धा वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला लाभलेल्या प्रतिसादातून आता पुढे अनेकांना मार्ग खुला करून दिला.

या संमेलनात संजीव कोकील, अशोक भांडवलकर, विशाल उशिरे, गुणवंत पाटील, जोत्स्ना राजपूत, सुनीता रामचंद्र, सोमनाथ चव्हाण (महाराष्ट्र पोलिस), पीएसआय प्रवीण फणसे आणि कुटुंबीय, श्रद्धा खानविलकर, वैभव वरडी, शांताराम लोखंडे, उमेश जाधव, जितेंद्र लालड, अमोल म्हात्रे, सौरभ साळुंखे, रंजना केणी यांनी सहभाग घेऊन नव्या क्षितिजावर कवितेची मोहोर उमटवली. प्रारंभी अॅड. विलास नाईक, प्रा. अशोक बागवे, डॉ. भक्तिकुमार दवे, कांतीलाल कडू यांची कवितेला समर्पित भाषणे झाली.

महाराष्ट्राला सांस्कृतिक कार्य मंत्री नाहीत, अशी उपरोधिक टीका करून आपल्या उत्तुंग संकल्पनेतून साहित्य, संस्कृतीचा ठेवा जतन करताना सामाजिक भान आणि संस्कृतीला हातात हात घालून महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी राज्यस्तरावर कार्यक्रमाचे वारंवार आयोजन करणारे कांतीलाल कडू हेच मला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री वाटतात, असे गौरोद्गार प्रा. अशोक बागवे यांनी काढले.

शेरोशायरीची उधळण करत डॉ. राजेंद्र राठोड यांनी ठसकेबाज शैलीत सूत्रसंचालन केले.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply