स्वरार्पण यूट्यूबवर नित्यपठणाची ३० स्तोत्रे

रत्नागिरी : येथील युवा गायक, संगीत शिक्षक श्रीधर पाटणकर यांनी स्वरार्पण यूट्यूबवर नित्यपठणाची ३० स्तोत्रे स्तोत्रमास या उपक्रमाखाली प्रसारित केली आहेत.

स्वरार्पण-श्रीधर पाटणकर या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून स्तोत्रमास ही ३० स्तोत्रांची मालिका नुकतीच पूर्ण झाली. त्याअनुषंगाने बोलताना त्यांनी सांगितले की, यात अनेक अनवट स्तोत्रांच्या रचना सादर केल्या आहेत. गेल्या ९ ऑगस्टपासून या मालिकेला सुरवात झाली. या मालिकेत करुणात्रिपदी, अन्नपूर्णा स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, पांडुरंगाष्टक अशी ३० स्तोत्रे म्हटली आहेत. पसायदानाने या स्तोत्रमास मालिकेची सांगता झाली आहे.

संगीत शिकणाऱ्या मुलांना सुरांवर आणि शब्दांवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर त्यांनी सुरवातीला वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्रे प्रथमतः सुरात म्हणायला शिकावीत. त्यामुळे नक्कीच सूर पक्के होतात आणि भाषा शुद्ध होते. बदलत्या जगामध्ये लहान मुलांना अध्यात्माची, स्तोत्रांची गोडी लागावी. त्यांच्या कानावर चांगले संस्कार व्हावेत, आबालवृद्धांना ही स्तोत्रे शांतपणे ऐकून त्याचे समाधान लाभावे, अशी स्तोत्रमास उपक्रमाची अपेक्षा असल्याचे श्री. पाटणकर यांनी सांगितले.

स्तोत्रमाला मालिकेसंदर्भात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. निधी पटवर्धन म्हणाल्या की, स्वरांना अर्पण ही भावनाच कितीतरी श्रेष्ठ आहे. सूर आपल्याला खूप काही देत असतात, परंतु त्यांच्यासाठी आपण काही देणे लागतो, ही भावना एका निस्सीम गायक साधकाच्या मनातच येऊ शकते. माझ्या योगसाधना वर्गात दर गुरुवारी विसरू कसा मी गुरुपादुकाला हे स्तोत्र मी अवश्य लावते. श्रीधरसारख्या तरुण गायकाने या पिढीसाठी हा एक ठेवा दिलेला आहे. सोशल मीडियात अडकलेली पिढी या माध्यमातून कोणताही आडपडदा न ठेवता स्वतःशी संवाद करू लागेल असे वाटते. प्रत्येक स्तोत्र त्या त्या छंदात म्हणणे आवश्यक असते, श्रीधरने ही स्तोत्रे अभ्यासपूर्वक सादर केली आहेत. अभ्यासोनी प्रकटावे या उक्तीप्रमाणे आणि भक्तिभावनेची जोड सोबत घेऊन श्रीधरचे सुमधुर स्वर प्रकट झाले आहेत.

साहित्यिक, ज्येष्ठ संगीत नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनीही श्रीधरच्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, नव्या दमाचा तरुण अभिजात गायक श्रीधरने एक आगळीवेगळी सुरेल मैफल आपल्या दमदार आवाजात सादर केली आहे. सातत्य, मांडणी, सादरीकरण आणि आत्मविश्वास, नव्या पिढीच्या कसदार प्रतिभावान तरुणाईसाठी दिलासादायक वाटतो. ऋषीमुनींच्या निष्ठेने, पौरुषेय आणि अपौरुषेय अक्षरवाङ्मयाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन चिरंतन करण्याचे एक महत्त्वाचे काम श्रीधरने केले आहे. सातत्यपूर्ण स्वरूपात एखादा उपक्रम सुरू ठेवणे अवघड असते, पण श्रीधरने नेटाने हा उपक्रम सुरू ठेवून पूर्णत्वाला नेला, त्याचा हा उपक्रम उल्लेखनीय आहे आणि अनुकरणीय आहे. अनवट आणि दुर्मिळ रचनांचा मागोवा घेत, श्रीधरने संस्कृतिसंवर्धनाच्या नव्या वाटांचा शोध घेतला तर त्याचे हे कार्य नक्कीच लक्षणीय ठरेल.

श्रीधर पाटणकर यांनी म्हटलेले गणपती स्तोत्र

श्रीधर पाटणकर यांनी म्हटलेली करुणाष्टके

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply