दीपपूजनाचे औचित्य साधून कन्येचा वाढदिवस!

‘भा’ म्हणजे तेज. ‘रत’ म्हणजे मग्न. भारतीय म्हणजे तेजाच्या उपासनेत, म्हणजे साधना करण्यात जे मग्न आहेत ते. उपासनेला भारतीय संस्कृतीत फार महत्त्वाचे स्थान आहे. या तेजोमयी संस्कृतीचे प्रतीक म्हणजे ‘दीप.’ आजचा दीपपूजनाचा दिवस या दृष्टीने भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचे आहे. कारण आज आहे दीप अमावास्या. आषाढ महिन्यातील अमावास्येलाच ‘दिव्यांची अमावास्या’ म्हटले जाते. रात्रीच्या अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप भारतीयांच्या घराघरात मांगल्याचे प्रतीक म्हणून पुजला जातो. जे दिवे वर्षभर प्रकाश देत राहतात, त्यांची या दिवशी घरात मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. सोबत घरातील लहान मुलांचीही प्रेमपूर्वक ओवाळणी करून “आयुष्यमान हो” हा आशीर्वाद देण्याचा हा शुभदिवस.

आमच्या दृष्टीने दीप अमावास्येचा हा दिवस खूप आनंदाचा. कारण सात वर्षांपूर्वी, १४ ऑगस्ट २०१५ रोजी दीप अमावास्येलाच सायंकाळी ४ वाजता आम्हा उभयतांना कन्यारत्नाचा लाभ झाला. गेली पंधरा वर्षे दिवाळीत आश्विनी अमावास्येला आम्ही फ्रेण्ड्स ग्रुपच्या माध्यमातून सातत्यपूर्वक लक्ष्मीपूजन अर्थात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर लांजा शहरात कोकणातील सर्वांत मोठा दीपोत्सव अकरा हजार पणत्या प्रकाशित करून साजरा करीत आहोत. त्याचेच फळ म्हणून की काय, विधात्याच्या आशीर्वादाने दीपामावास्येच्या शुभदिनीच आमच्या घरी “विधी”च्या रूपाने दीपिकेचाच जन्म झाला. हा ईश्वरी संकेत जोपासण्याच्या दृष्टीनेच गेली सात वर्षे दीपामावास्येला आम्ही जाणीवपूर्वक दीपलक्ष्मीचे पूजन करीत आहोत.

आज कुमारी विधीचाही तिथीप्रमाणे जन्मदिवस. तिचेही आम्ही सर्वांनी प्रेमाने औक्षण केले. तिला खूप खूप मोठी हो, असा आशीर्वाद दिला. छोट्या विधीनेही आमच्यासोबत
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यय: ।।
आरोग्यं देहि पुत्रांश्च दीपज्योति : नमोस्तुते !!

हा श्लोक म्हणत दीपपूजन केले.

वैदिक काळात ऋषीमुनींच्या आश्रमातील यज्ञवेदी आणि अग्निकुंडे ही धार्मिकांची यात्रास्थाने झालेली होती. यज्ञवेदी हा तत्कालीन समाजाचा मानबिंदू होता. ते त्यांचे श्रद्धास्थान होते. यज्ञवेदीतील अग्निदेवतेला साक्षी ठेवून ऋषी-महर्षींच्या आध्यात्मिक चर्चा-परिसंवाद घडत. वेद, ब्राह्मण्ये, उपनिषदे आणि संहिता जन्मास आल्या त्या अशा. भारताच्या महान सांस्कृतिक परंपरेचा उगम अशा रीतीने यज्ञवेदीतील अग्निशलाकेतून झाला. कालांतराने या पवित्र आणि मंगल शलाकेने दीपाचे रूप धारण केले.

अग्निर्ज्योति रविर्ज्योति चन्द्रज्योतिस्थैव च।
ज्योतिशा मुक्तयो कामाक्ष्ये दीपोऽयं प्रतिगृह्यताम्।

या दीपयुगाला सुरवात झाली ती अशी – सूर्यांश संभवो दीप:
दीपयुगाच्या सुरवातीपासूनच आजतागायत दीपाला जीवनातील मांगल्याचे, भक्तीचे, अर्चनाचे आणि आशीर्वादाचे शुभलक्षण मानले गेले आहे.

दीपपूजनाच्या या पवित्र दिवशी कु. विधीच्या जन्मदिनी दरवर्षी एक नवा दीप आमच्या संग्रही करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. गतवर्षी आम्ही वैशिष्ट्यपूर्ण मयूरदीप खरेदी केला, तर यंदा मे महिन्यात हंपी या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी गेलो असता तेथूनच दोन्ही हातात दिवा घेतलेली लक्ष्मी अर्थात ‘दीपलक्ष्मी’ रूपी आकर्षक दीप खरेदी केला. गेली अनेक वर्षे दीपलक्ष्मीच्या शोधात असलेला आमचा दीपसंग्रह त्यादृष्टीने आता परिपूर्ण झाला. यंदा या सर्व दीपांची पूजा करताना दीपलक्ष्मीचा दीप प्रकाशित झाल्यावर आणखी आकर्षक दिसू लागला. तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणाऱ्या आपल्या समाजाने इतर सणांप्रमाणेच या उत्सवाचेही विकृतीकरण करीत त्याला ‘गटारी अमावास्या’ हे नाव बहाल केले. हे खेदजनक आहे. एकूणच तमसोsमा ज्योतिर्गमयची आर्त याचना करणाऱ्या मानवाला नेणिवेतून जाणिवेकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि नश्वरतेतून अमृतत्वाकडे नेणाऱ्या दीपलक्ष्मीकडे एकच प्रार्थना, आमची लाडकी परी विधीला सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव।

  • विजय हटकर, लांजा
    (8806635017)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply