लांजा तालुक्यातल्या रावारी गावचा सुपुत्र आणि जवळचा मित्र प्रसन्न रामचंद्र दीक्षित अचानक या जगातून निघून गेला आहे. त्याला जवळचा तरी कसं म्हणावं? जवळचा असता तर त्याच्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनात निर्माण झालेली एखादी अस्वस्थता त्याने बोलून दाखवली असती, पण त्याच्या तोंडून त्याबद्दल कधीही साधा उल्लेखही झाला नाही. भाऊ, भावाची बायको, आई, वडील, त्यांचं आजारपण याविषयी तो अनेक वेळा बोलला, पण वैयक्तिक आयुष्याबद्दल त्याने कधीही अवाक्षरही काढलं नाही. वैयक्तिक वैवाहिक जीवनात तो हताश झाला असावा, हे त्याच्यासारख्या स्वच्छ राजकीय कार्यकर्त्याने गळफास लावून जीवन संपवलं, तेव्हाच लक्षात आलं.
प्रसन्नाची आणि माझी ओळख २८ वर्षांपूर्वी झाली. दैनिक सकाळचा लांजा तालुका बातमीदार म्हणून त्याची निवड झाली होती. त्यानिमित्ताने ती ओळख झाली होती. तेव्हा लांजा पंचायत समितीचे सभापती असलेले मनोहर रेडीज यांच्याच गावातल्या निकृष्ट दर्जाच्या जलवाहिनीची बातमी त्याने दिली होती. या बातमीवरून तेव्हा गहजब उडाला होता. पण प्रसन्नने दिलेली वस्तुस्थिती सभापतींनाही मान्य करावी लागली. त्यानंतर त्यामध्ये दुरुस्तीही करावी लागली. लांजा तालुक्याच्या ग्रामीण भागातले असे अनेक प्रश्न प्रसन्नने आपल्या बातमीदारीच्या काळात लिहिले होते. पण बातमीदारीमध्ये त्याचं मन रमलं नाही. बातमीदार म्हणजे ग्रामीण भागातला एक कार्यकर्ता असला तरी त्याच्यामध्ये कार्यकर्ता अधिक होता. त्यामुळे बातमीदारीतून बाहेर पडून त्याने सामाजिक कार्याला पूर्णपणे वाहून घेतलं. भारतीय जनता पक्षाचा तो निष्ठावंत कार्यकर्ता होता.
कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार अशोक मोडक, संजय केळकर यांच्या प्रचाराचं काम त्यांनी केलं होतं. त्यानिमित्ताने त्याचा जिल्ह्याच्या आणि त्यावरच्या राजकारणात प्रवेश झाला. पण तो कार्यकर्ताच राहिला. ग्रामपंचायत सदस्यत्वापलीकडे मोठा नेता बनण्याची स्वप्नं त्याला पडली नाहीत किंबहुना त्याने तसं कधीही दाखवून दिलं नाही, पण पक्षकार्याच्या माध्यमातून मोठ्या नेत्यांशी त्याचे अत्यंत जवळकीचे संबंध होते. माजी आमदार आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, बाबा परुळेकर, माजी मंत्री विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, अगदी नितीन गडकरींपासून गोव्याचे मनोहर पर्रीकर यांच्यापर्यंत अनेक मोठ्या नेत्यांशी तो केव्हाही सहज संपर्क साधू शकत असे. संजय केळकर यांच्या आमदार निधीतून त्याने अगदी आपल्या गावापर्यंतच्या रस्त्यासारखी अशक्य वाटणारी कितीतरी कामं करून घेतली. पण केवळ आपल्या गावासाठी नव्हे, तर परिसरासाठीसुद्धा त्याने अनेक कामं करून घेतली.
संगमेश्वर तालुक्यातल्या साखरपा गावात दोन वर्षांपूर्वी महापूर आला. गावात मोठं नुकसान झालं. त्यातून गावाने एकत्र येऊन नदी स्वच्छ करण्याची, गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली. नाम फाउंडेशनने त्यांना मदत केली. या कामाला त्याने स्वतः भेट दिली. अशा स्वरूपाचं काम आपल्याही तालुक्यात ठिकठिकाणी उभं राहिलं पाहिजे, यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. लांजा तालुक्यात पूर्वीचा जनसंघ किंवा आताचा भारतीय जनता पक्ष तितकासा रुजला नाही. आधी प्रजासमाजवादी, नंतर समाजवादी आणि त्यानंतर काँग्रेसचं वर्चस्व राहिलं. अलीकडचा काळ शिवसेनेने व्यापून टाकला. अशा प्रतिकूल परिस्थितीसुद्धा प्रसन्नने पक्षासाठी भरीव काम केलं. आपलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. ते इतकं की त्याच्याशिवाय लांजा तालुक्याचं राजकारण चालू नये. लांज्यातल्या राजकारणावर त्याचा बराच अंकुश होता. त्याच्या धोरणांना आणि राजकारणाला प्रचंड विरोध झाला तरी तो त्यात टिकून राहिला.
शेतकरी आणि उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तो वेगवेगळ्या व्यासपीठावर हजेरी लावत असे. कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यक्रम असोत किंवा स्वतःच आपल्या गावात सुपारी लागवडीचे प्रश्न सोडविण्यासाठी आयोजित केलेली कार्यशाळा असो, बांबू लागवड कार्यशाळा असो की शेतकरी मेळावे असोत, तो सहजगत्या त्या ठिकाणी सामावून जात असे. हिरीरीने पुढाकार घेत असे. शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण भागातील लोकांचे पायवाटांचे, रस्त्यांचे, पिण्याच्या पाण्याचे, बंधाऱ्यांचे असे कितीतरी प्रश्न ठासून मांडत असे. तेवढ्यावरच थांबून राहण्याचा त्याचा स्वभावच नसे. एखादा रस्ता पंतप्रधान सडक योजनेत बसवायचा की मुख्यमंत्री योजनेत बसवायचा, याविषयी त्याचा अभ्यास दांडगा होता. स्वतः तो अभ्यास करत असे. निकषांमध्ये रस्त्यासारखी कामं बसवून घेण्यासाठी तो आटापिटा करत असे. एखाद्या रस्त्यासाठी किंवा एखाद्या पाऊलवाटेसाठीसुद्धा शेकडो पत्र त्याने लिहिली आहेत. लांजा तालुक्यातल्या जावडे या गावाची रावारी ही आधीची वाडी होती. ओढावजा नदीमुळे या दोन वाड्यांचे दोन भाग झाले आहेत. पण जावडे गावातून रावारीवाडीकडे जाणारा साकव ही एक मोठी समस्या होती. ग्रामस्थांनाच तो बांधावा लागत होता. बांधला नाही तर पावसाळ्यात मुख्य गावाचा संपर्क तुटत असे. सरकारी मदत मिळत नव्हती. त्यातून कायमस्वरूपी साकवासाठी इतरांच्या बरोबरीने प्रसन्नानेही पुढाकार घेतला होता. पण साकवावर त्याचं समाधान झालंच नाही. आधी सांगितल्या तशा योजनेमधून त्याने त्या वाडीकडे जाणारा स्वतंत्र रस्ता तयार करून घेतला. इतकंच काय, तिथं असणाऱ्या शाळेतल्या मुलांसाठी एसटीची गाडीही त्या रस्त्यावरून सुरू करून घेतली. हे एकट्या त्याच्या स्वतःच्या गावाचा उदाहरण झालं. पण परिसरातल्या अनेक गावांनाही अनेक विकासकामांसाठी तो मदत आणि मार्गदर्शन करत असे. सरकारदरबारी पत्रव्यवहार करणं, शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवणं हेच त्याचं जीवन होतं. अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यातला निम्म्याहून अधिक वेळ अर्थातच उमेदीचा काळ त्याने या समाजकार्यासाठी वेचला.
नातेवाईक आणि मित्रमंडळींसाठी तर मदतीसाठी तो सदैव सज्ज असायचा. कौटुंबिक कार्य अhttps://youtu.be/KFbS8Sk1wF0सेल, उत्सव असेल किंवा अगदी अंत्यसंस्कारासारखे दुःखद प्रसंग असतील तर तो आपल्या मित्रपरिवाराच्या, कुटुंबीयांच्या समारंभांना आवर्जून हजेरी लावत असे. शुभेच्छा देत असे. वेळप्रसंगानुसार सांत्वन करत असे. कोणाच्याही मदतीला धावून जाणं हा तर त्याचा स्थायिभाव होता. कित्येक किलोमीटर गाडी चालवून रुग्णांना मोठमोठ्या शहरांपर्यंत घेऊन जाण्याचं काम आहे त्याने केलं आहे. अशी कितीतरी काम सांगता येतील.
स्वतःच्या कौटुंबिक अस्वस्थतेविषयी मात्र त्याने कधीही ब्र काढला नाही. त्यामुळे त्याने स्वतःचं जीवन अकाली संपवून टाकण्याएवढ्या टोकाला तो जाईल, असं कल्पनेतही वाटलं नव्हतं.पण तो आता अशा भावना समजून घेण्याच्या पलीकडे गेला आहे. एक नि:स्वार्थी मित्र गमावल्याचं दुःख लवकर भरून येणार नाही आणि असा नि:स्वार्थी कार्यकर्ता खूप शोध घेतला, तरच सापडू शकेल.
आपल्या स्वतःच्या अकाली जाण्यामुळे अप्रसन्नता देऊन गेलेल्या प्रसन्न दीक्षितला मनःपूर्वक श्रद्धांजली.
- – प्रमोद कोनकर
- (९४२२३८२६२१)


वडीलांचे नांव रामकृष्ण .