अवघ्या ४५० रुपयांत कौशल्य प्रशिक्षण देणारे जनशिक्षण संस्थान रत्नागिरीत

रत्नागिरी : अवघ्या ४५० रुपयांत कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या जनशिक्षण संस्थान योजनेअंतर्गत रत्नागिरीत प्रशिक्षकांची पहिली कार्यशाळा उत्साहात पार पडली.

जनशिक्षण संस्थान ही योजना भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे राबविण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मानव साधन विकास संस्थेच्या माध्यमातून ही योजना राबविली जात असून माजी आमदार डॉ. विनय नातू संस्थेचे अध्यक्ष आहेत. औपचारिक शिक्षण पूर्ण न करू शकलेल्या तरुणांना तसेच महिलांना आवश्यक असणाऱ्या व्यासायिक कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन या योजनेच्या माध्यमातून गाव स्तरावर केले जात आहे. दक्षता, स्वावलंबन आणि सन्मान या त्रिसूत्रीचा अवलंब करून ग्रामीण जनतेच्या उपजीविकेला आणि पर्यायाने ग्रामीण विकासाला चालना देण्याचे काम योजनेतून होत आहे. साक्षरता, पर्यावरण, आरोग्य, महिला प्रबोधन आदी विषयांवरही योजनेच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. योजनेअंतर्गत दहा प्रकारचे प्रशिक्षण निवडण्यात आले आहे. त्यामध्ये टेलरिंग, ब्युटी पार्लर, ज्यूट हस्तकला उत्पादन निर्मिती, फळ आणि भाज्या प्रक्रिया आणि साठवणूक, भरतकाम यासोबतच टू थ्री व्हीलर मेकॅनिक, इलेक्ट्रिकल टेक्निकल हेल्पर, असिस्टंट प्लंबर, असिस्टंट वेल्डर आणि फॅब्रिकेटर आणि सहायक संगणक ऑपरेटर असे कोर्सेस तीन ते चार महिन्यांच्या कालावधीकरिता घेण्यात येणार आहेत. कोर्सची फी ४५० रुपये आणि प्रवेश फी १० रुपये आहे. एससी, एसटी, दिव्यांग जन तसेच दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांसाठी शिकवणी शुल्क आकारले जाणार नाही. त्यांना केवळ १० रुपये प्रवेश शुल्क भरून कोर्सला प्रवेश घेता येणार आहे. यशस्वीपणे कोर्स पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना केंद्र शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचा उपयोग बँक लोन तसेच उद्योग-व्यवसाय आणि नोकरीसाठी करता येणार आहे.

या योजनेअंतर्गत प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या मंडळींसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कोर्सचा परिचय, अंमलबजावणी प्रक्रिया तसेच योजनेअंतर्गत कार्यप्रणालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नाबार्डचे जिल्हा प्रबंधक मंगेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. जनशिक्षण संस्थान रत्नागिरीच्या संचालिका सौ. सीमा यादव तसेच कार्यक्रम अधिकारी निधी सावंत, समन्वयक संतोष घडशी यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सहायक कार्यक्रम अधिकारी स्वप्नील साखरकर यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जनशिक्षण संस्थान रत्नागिरीचे स्वप्नील साखरकर, ऋतुजा पार्टे आणि आशीष बामणे यांनी सहकार्य केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply