महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कोकणातील लोकगीते, लोककला स्पर्धा

चिपळूण : कोकणातील लुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे लोकगीते आणि लोककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या पाच आणि उत्तेजनार्थ दहा लोककलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

लोककलावंतांना सन्मान मिळवून देणे, लोककलाकारांचे संघटन करणे, शासकीय पातळीवर दखल घेतली जावी यासाठी प्रयत्न करणे, लोककलाकारांचा परस्पर परिचय आणि संघटन निर्माण करणे, काळाच्या ओघात पिढ्या दर पिढ्या मातीच्या थराआड लुप्त होत चाललेले लोककलेचे शिल्लक धन जपण्यासाठी, संवर्धनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

लोककलेच्या समृद्ध वारशाची जपणूक करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, भारूड, जाखडी, गोमू, काटखेळ, संकासूर, भजन, डेरा, कव्वाली, जलसा, गज्जो, कातकरी, आदिवासी, लोककला यासोबत जुनी सांस्कृतिक गीते, शेती गीते, भलरी गीते, लग्नगीते, होळीगीते, बारसागीते (सुहेर गीते), विधी गीते, डाक गीते, मुस्लिम विधी गीते, मुस्लिम विवाह गीते या व अशा इतर काळाच्या पडद्याआड चाललेल्या लोकगीते, लोककला, लोककथा, विधीकथा आणि सांस्कृतिक ठेवा यांचे संकलन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने चिपळूण मसापने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील, कोणत्याही जाती-धर्माची व्यक्ती सहभागी होऊ शकते. स्पर्धेतील प्रकार हा अस्सल पारंपरिक असणे अपेक्षित असून स्पर्धकाने त्याची लिखित संहिता पाठवणे बंधनकारक आहे. स्पर्धकाने उत्तमोत्तम पारंपरिक लोकगीते, लोककला, पारंपरिक सांस्कृतिक खेळ, संस्कृतीदर्शक कोणताही पारंपरिक रूढ प्रकार मोबाइल किंवा कॅमेऱ्याने शूटिंग करून या स्पर्धेसाठी पाठवायचा आहे.

स्पर्धेतील गीत, कला, खेळ, रूढ प्रकार हे अस्सल पारंपरिकच असावेत. त्याची चाल, प्रकार, शब्दयोजना, मांडणी कोणतेही आधुनिक संस्कार न करता मूळ जुन्या रूपातच असावी. व्हिडीओचा/कलेच्या प्रकाराचा कालावधी किती असावा याबद्दलचे स्वातंत्र्य व्हिडीओ बनविणाऱ्याला आहे. एखादा कलाप्रकार किती वेळात सर्वंकष पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचू शकेल, याचा अंदाज घेऊन व्हिडीओचा कालावधी ठरवावा. शक्यतो व्हिडीओ खूप मोठा होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. शूटिंग मुद्दाम तयार केलेले किंवा प्रत्यक्षात कार्यक्रम सादर होत असताना केलेले किंवा पूर्वीही केलेले असले तरी चालू शकते. स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील, कोणत्याही जातीधर्माची व्यक्ती सहभागी होऊ शकते. स्पर्धक वरील नमूद कला प्रकाराशिवाय कोणत्याही जातीधर्मातील इतर कोणताही लोककला प्रकार किंवा विस्मृतीत गेलेला कलाप्रकार सादर करू शकते. मोबाइलवर व्हिडीओ बनवताना मोबाइल आडवा ठेवून व्हिडीओ बनविणे आवश्यक आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग (फक्त आवाज) साठीही स्पर्धक स्पर्धेत भाग घेऊ शकतो. वाद्य आणि लाइव्ह अॅक्शन यांना अधिकचे वेगळे गुण असणार आहेत. व्यावसायिक ग्रुपनी स्पर्धेत सहभागी होताना पारंपरिकता जपली जाईल, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. बोल नीट कळावेत यासाठी गीत/गाणे/कला प्रकार व्यवस्थित लिहून पाठवणे (लिखित संहिता) आवश्यक आहे. व्हिडीओसोबतच लिखित संहिता फोटो काढून किंवा टाइप करून पाठवावी. संहितेमध्ये अगदी थोडक्यात गीताचा आशय किंवा गाण्याची लौकिक कथा लिहून पाठवावी. गाण्यांमध्ये काही स्थानिक किंवा पारंपरिक जुने शब्द आले असतील तर त्या शब्दांचा अर्थ शेवटी नमूद करावा. तसेच काही गीते रेकॉर्ड करणे किंवा चित्रित करणे शक्य न झाल्यास, ती फक्त लिखित स्वरूपात पाठवली तरी चालू शकतील. संहितेच्या शेवटी स्पर्धकाचे नाव, मोबाइल क्रमांक, पत्ता यांचा स्पष्ट उल्लेख असावा.

स्पर्धा रत्नागिरी जिल्हास्तरीय असली तरी जिल्ह्याबाहेर राहाणारा कोणीही मूळ रत्नागिरीकर या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. अशांनी आपल्या गावाचा स्पष्ट उल्लेख प्रवेशपत्रात करावा. या अभिनव स्पर्धेतून अंधश्रद्धांचे उदात्तीकरण करण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र भुते, भगत, बाया, देवाचा नवस, अशुभ कार्याचे विधी यामध्येही गाण्यांचा सांस्कृतिक ठेवा आहे. स्पर्धेच्या दृष्टीने हा ठेवादेखील महत्त्वाचा मानला जाणार आहे. स्पर्धात्मक निकष हे लोककला प्रकार, चित्रीकरण, वाद्य, लिखित संहिता, सादरीकरण, दुर्मिळता याआधारे दिले जातील. व्हिडीओ साइज मोठी झाल्यास aparant.msp@gmail.com या ई-मेल गुगल ड्राइव्हवर शेअर करावा किंवा शक्य असल्यास पेन ड्राइव्हमधून स्पर्धा संयोजकांकडे जमा करावा.

पुरस्कारांचे स्वरूप असे – २१,०००/- १५,०००/- ११,०००/- ७,५००/- ५,०००/- उत्तेजनार्थ १० प्रत्येकी १,१११/- रुपयांची रोख बक्षिसे दिली जातील. सर्व यशस्वी स्पर्धकांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, पुस्तके, हापूस आंब्याचे कलम तसेच पहिल्या ५० स्पर्धकांना हापूस आंबा कलम भेट देण्यात येणार आहे. एक व्यक्ती कितीही प्रवेशिका पाठवू शकते. स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची अंतिम मुदत १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आहे.

स्पर्धेचा निकाल आणि पुरस्कार वितरण चिपळूण येथे होणाऱ्या भव्य लोककला महोत्सवात होईल. त्यावेळी यशस्वी कलावंतांना सादरीकरण करण्याची संधी मिळणार असल्याचे स्पर्धेचे समन्वयक आणि इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे, स्पर्धा संकल्पक आणि भाषा अभ्यासक, समीक्षक अरुण इंगवले, स्पर्धा संयोजक प्रा. संतोष गोनबरे यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२३९५६६८ किंवा ९४२३२९१४८५ या मोबाइलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply