रत्नागिरी जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी आलेली नाही. त्याबाबत फिरत असलेले व्हिडीओ, ऑडिओ खोटे असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सोशल मीडियावर शालेय मुले पळविणारी टोळी दाखल झाली आहे. ती सक्रिय आहे. तीन मुलांचे अपहरण झाले आहे, वगैरे बातम्या आणि छायाचित्रे तसेच व्हिडीओ, ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा कोणत्याही टोळ्या सक्रिय आणि दाखल झाल्याबाबतची तक्रार अथवा खात्रीशीर माहिती अगर अशा प्रकारातून अपहरण झाल्याची तक्रार झालेली नाही.

सर्व नागरिकांनी खात्री झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या क्लिप व्हायरल झाल्यास त्यास समाजमाध्यमांद्वारे अथवा नागरिकांकडून दुजोरा देऊ नये. अशा प्रकारचे व्हिडीओ पसरवू नयेत. पुढे पाठवू नयेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरेल, अशी कृती करू नये.

या विषयासंदर्भात खात्रीशीर माहिती मिळाल्यास रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक (02352) 222222 तसेच अतितात्काळ हेल्पलाइन डायल 112 वर संपर्क करावा. अफवा पसरवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता नागरिकांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात येत आहे.

अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घडल्याचे निदर्शनास आल्यास अथवा संशयास्पद हालचाली दिसून आल्यास त्याबाबतची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे. कोणी जाणीवपूर्वक असे संदेश पसरवत असेल. तर संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply