रत्नागिरी : कोरपना (चंद्रपूर) येथील गझल मंथन साहित्य संस्थेच्या रत्नागिरी शाखेतर्फे रत्नागिरीत पहिलाच गझल मुशायरा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये जुन्याजाणत्या गझलकारांबरोबर नवोदित गझलकरांच्या एकापेक्षा एक गझलांनी रसिकांना अक्षरशः वेडे केले. गझलनवाज भीमराव पांचाळे यांची खास मुलाखतही चांगलीच रंगली.
मुशायऱ्याचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध गझलकार डॉ. कैलासजी गायकवाड यांनी भूषविले, तर प्रसिद्ध गझलकार स्नेहल कुलकर्णी यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी त्यांच्या भाषणातून गझलचे अंतरंग उलगडले आणि माहिती दिली. गझल मंथन साहित्य संस्थेविषयी माहिती देऊन ही संस्था गझल प्रचार आणि प्रसारासाठी कशी कार्यरत आहे, हेदेखील सांगितले. कैलासजींनी त्यांची अप्रतिम गझल रसिकांना ऐकवून मंत्रमुग्ध केले. दोघाही अतिथींनी गझल विधा आणि गझल मंथन संस्थेच्या कार्याबाबत रसिक आणि गझलप्रेमींना माहिती दिली.
हा रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच मराठी गझल मुशायरा होता. त्यावेळी सौ. सुनेत्रा जोशी, अजीज मुकरी, संजय कुळ्ये, शुभम कदम, आशीष सावंत, विजयानंद जोशी, सौ. सुनेत्रा विजय जोशी. मकसूद सय्यद, अश्रफ मुक्री, निळकंठ पावसकर, पूर्णिमा पवार, मुग्धा कुळ्ये, संजय तांबे, रूपाली पाटील, माधुरी खांडेकर, राजू सुर्वे, देवीदास पाटील यांनी आपली गझल सादर केली. त्यांच्या गझलांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. विशेष म्हणजे मुशायऱ्यातील गझलकारांना गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्यासमोर गझल सादर करण्याची संधी मिळाली. भीमरावांनीही अनेकांना दाद देऊन प्रोत्साहन दिले.
गझल मंथनच्या रत्नागिरी जिल्ह्याध्यक्षा पूर्णिमा पवार यांनी प्रास्ताविक केले. अतिथींचा परिचय जिल्हा उपाध्यक्ष संजय कुळये यांनी करून दिला. या मुशायऱ्याचे बहारदार सूत्रसंचालन मकसूद सय्यद यांनी केले. मुशायऱ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल गझल मंथनच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष पौर्णिमा पवार, उपाध्यक्ष संजय कुळ्ये आणि सचिव सौ. सुनेत्रा विजय जोशी यांना सर्व रसिक गझलप्रेमींनी धन्यवाद दिले.
यावेळी सादर झालेल्या काही गझला अशा –
चेहरा हासरा खरा नाही
भाव खोटा असा बरा नाही
कोणता भाग दाखवू सांगा
काळजाला जिथे चरा नाही
( सुनेत्रा जोशी)
एकदा मी बंड केले,
मारले त्यांनी मला
घालुनी उंची कफन
शृंगारले त्यांनी मला
(अजीज मुकरी)
हळू हळू नव्या युगास पाखरे सरावली
गहाण पंख टाकले नि पिंजऱ्यात धावली
तिच्या अलिंगनास मी दिशाच बाहू बनविल्या
किती अथांग ती!… कुठे कवेत माय मावली
(संजय कुळ्ये)
पिंजऱ्याबाहेरची स्वप्ने बघत बसलो
रात्रभर खिडकीतुनी तारे बघत बसलो
अक्षता हातातल्या संपल्यानंतर
मंडपाच्या आतले पंखे बघत बसलो
(शुभम कदम)
खूण दिसेना सन्मार्गावर काय करावे
वाट संपली अर्ध्यानंतर काय करावे
शिवबा माझा पुन्हा यायला आतुर आहे
नको जिजाऊ इथे कुणा तर काय करावे
(आशीष सावंत)


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

