आश्विन महिन्यातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत भारतात सर्वत्र धूमधडाक्यात उत्साहाने आणि भक्तिभावाने नवरात्रोत्सव साजरा होत असतो. त्याचा शेवटचा दिवस म्हणजेच विजयादशमी/ दसरा असतो. शेतात पीकपाणी चांगले आल्याने शेतकरी खूष असतात. निसर्गाची कृपा लाभल्याने त्या निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. साहजिकच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरलेले असते.
विजयादशमी म्हणजेच विजयाचे द्योतक असते. त्या तिथीला दसरा आणि विजयादशमी असेही म्हणतात. रामायण आणि महाभारताशी या तिथीचा चांगलाच संदर्भ आहे. विष्णू अवतारी रामाने दुष्ट, अत्याचारी, दुराचारी, महाप्रतापी शिवोपासक अशा रावणाला ठार मारले आणि जनतेला त्याच्या त्रासापासून मुक्त केले. म्हणून हा उन्मादाने भरलेला विजयोत्सव . याच तिथीला पांडवांनी गुप्तपणे शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे बाहेर काढून विजयासाठी सीमोल्लंघन केले आणि आपल्या नियोजित कार्यासाठी ते बाहेर पडले. म्हणून या दिवशी आपल्या व्यवसायाला आवश्यक असणारी शस्त्रे आणि अवजारांचे श्रद्धाभावनेने पूजन केले जाते. याच काळात आदिशक्तीने दुष्ट, दुराचारी चंड-मुंड आदी राक्षसांचा संहार करून सर्वांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले. म्हणून सर्वत्र धूमधडाक्यात साजरी होणारी ही विजयादशमी आहे. याचाच अर्थ असा की दुष्ट, घाणेरड्या, हिंसक अप प्रवृत्ती त्यागून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारण्याचा संकल्प करून आपण त्यानुसार कृतीदेखील करणे गरजेचे असते.
दसरा म्हणजेच दहा शिरे असलेल्या रावणाचा नाश. भारतभर हे तत्त्व पाळले गेल्याने हिंदू धर्मीय भारतात विजयोत्सव साजरा करीत असतात. ठिकठिकाणी कल्याणकारी आदिमायेस दुर्गा, चामुंडा, अंबिका काली अशा विविध नावांनी ओळखले जात असले तरी त्यामागील देवितत्त्व एकच आहे. तिच्याविषयी कृतज्ञता अनेक प्रकारांनी व्यक्त केली जाते इतकेच. विजयोत्सवाचा तो एक महत्त्वाचा भाग असतो. भारतातील हा विजयोत्सव म्हणजेच दसरोत्सव होय.
जल्लोषाने भरलेला दसरोत्सव म्हणजे भारताचे एक मोठे भूषणच म्हणावे लागेल. दसरोत्सव प्रत्येक ठिकाणी साजरा करण्याच्या पद्धती थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यामध्ये तत्त्व एकच आहे. दुष्ट, दुराचारी शक्तींपासून मुक्त झालेला सामान्य नागरिक आनंदी होतो. भारतातील अशा मोजक्या ठिकाणांचा परिचय करीत आहे.
कुलू (हिमाचल प्रदेश) – भारतातून आणि परदेशातूनदेखील लाखोच्या संख्येने लोक येथील दसरोत्सव पाहण्यास येतात. दर्शनोत्सव पाहण्यासाठी दरवर्षी लाखो प्रवासी घेत असतात त्यासाठी आपले वास्तव्य अगोदरच त्यांना राखून ठेवावे लागते. त्यामुळे इथला सण आंतरराष्ट्रीय आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यानिमित्ताने मोठी मिरवणूक काढली जाते. मोठी जत्रा भरते. रामलीलासारखे कार्यक्रम होत असतात. त्याचप्रमाणे पूजन, जागरण होत असते. मनाली ते कुलू हे ४० किलोमीटरचे अंतर मनालीत प्रसिद्ध हिडिंबा या जागृत देवीचे स्थान आहे. ऑक्टोबर महिन्यात ह्या उत्सवाची धामधूम आणि तयारी सुरू असते. कुलूच्या धलपूर मैदानात उत्सव होतो. त्या दरम्यान, लोकनृत्य, अन्य नृत्ये,नाटी नृत्य, पारंपरिक कार्यक्रम होतात. नाटी ही कुलूची देवता आहे. हिमाचल प्रदेश हिंदुबहुल असल्यामुळे हिंदूंचा तेथील महोत्सव खचीतच लक्षणीय ठरतो. उत्सवादरम्यान बाजारदेखील भरतो.
म्हैसूर – कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरातील उत्सव मोठा असतो. टेकडीवर असलेले हे देवीचे देऊळ अवश्य दाखविले जाते. प्रवेशद्वारातच दैत्याचा दगडी रंगीत पुतळा दिसतो. देवीने त्याचा तेथेच वध केल्याने त्या नगरीस म्हैसूर असे नाव पडले. घाट रस्त्याने बसने जाताना राजाचा राजवाडा दिसतो. तेथील दरवर्षीचा दसरोत्सव ही नगरीचीच नव्हे तर कर्नाटक राज्याचीदेखील शान आहे. मोठ्या धूमधडाक्यात नवरात्रोत्सव १० दिवस साजरा होत असतो. त्यानिमित्ताने सर्वत्र मोठी विद्युत रोषणाई केली जाते, फुलांची सजावट केली जाते. म्हैसूरच्या राजवाड्यापासून मोठ्या प्रमाणात सजविलेल्या हत्तीसोबत निघालेली रथयात्रा पाहणे म्हणजे एक अत्यंत प्रेक्षणीय प्रसंग असतो. प्रचंड जनसमुदाय तेथे हजर असतो. येथे मोठी जत्रा भरते. ते. मोठे आकर्षण आहे. कर्नाटकात त्यास नाद्दा – हब्बा असे म्हणतात.
अहमदाबाद – हे गुजरात राज्याचे राजधानीचे ठिकाण. तेथील दसरोत्सव आणखी एका जल्लोषात पार पडतो. गुजराती मंडळींची नवरात्रीची खास विशेषता म्हणजे गरबा नृत्य आहे. टिपर्यांच्या तालावर आणि वाद्यांच्या गजरात सामुदायिकरीत्या फेर धरणे आणि नृत्य करणे म्हणजे गरबा होय. उत्सवाच्या काळात शहरभर रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण केलेली असते. बरीचशी लोकगीते म्हटली जातात. गोल रिंगणात मधोमध लक्ष्मीची तसबीर आणि मूर्ती आणि हत्ती पूजिला जातो. त्याच्या भोवताली आनंदात फेर धरला जातो. या नवरात्रीच्या निमित्ताने चाहत्या मंडळींना एकत्र येण्याचे केलेले मोठे प्रयोजन म्हणावे लागेल. गुजरातमधील सर्वच ठिकाणी हा सण साजरा होत असला तरी अहमदाबाद नगरीची मजा, जोष, आनंद वेगळाच असतो.
तामिळनाडू – दसरोत्सव म्हणजे गोलू डान्स ही तामिळनाडूची खासियत आहे. कुलशेखरपट्टणम्, तिरुमलाई नायक, रघुनाथ सेठूपत्ती, मुरान्नाम आदी ठिकाणी ध्वजारोहण केले जाते. त्याच प्रमाणे विविध प्रकारच्या रंगावल्या काढल्या जातात. मंदिरे फुलांनी सजविली जातात. बाकी सर्व गोष्टी म्हैसूरप्रमाणेच असतात.
कोलकाता – पश्चिम बंगालच्या राजधानीचे शहर. ते हुगळी नदीच्या काठी वसले आहे. तेथे दुर्गा म्हणजेच काली देवी आहे. तिच्यामुळेच काली कट्टा म्हणजेच कोलकत्ता असे शहराला नाव पडले आहे. येथे सर्वत्र नवरात्र महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात चालू असतो. आपल्याकडील गणेशोत्सवाप्रमाणे येथे दुर्गोत्सवाला फार महत्त्व दिले जाते.
पंजाब, हरियाणा, चंदिगड येथे दसरा वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. ठिकठिकाणी रावणाची प्रतिमा प्रामुख्याने दहन केली जाते. त्यात हिंदूंबरोबर शीख बांधवदेखील सहभागी होत असतात. लुधियाना येथे मोठी जत्रा भरते. बिहार, आसाम, त्रिपुरा येथेही नवरात्रीच्या सहाव्या दिवसापासून ते नवरात्र उत्सव साजरा केला जातो. तेथील पंचांगाप्रमाणे दसरा ही तिथी अतिशय महत्त्वाची समजली जाते.
भारताबरोबरच परदेशात आपले बरेच भारतीय असल्याने तेथे हिंदू सण,परंपरा जपल्या जात असतात. पुढील पिढीला ते साहजिकच आदर्शवत आणि आदरणीयदेखील असते. अमेरिकेतील पूर्व किनाऱ्यावर न्यू जर्सी येथे दसरोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ठिकठिकाणाहून भारतीय मंडळी भरपूर प्रमाणात दसऱ्यालगतच्या रविवारी तेथील ठरलेल्या मोकळ्या मोठ्या जागेत एकत्र जमतात आणि जाहीरपणे त्यावेळी दशाननी स्वरूपी रावणाचे दहन केले जाते. इंग्लंडमधील बऱ्याच देवळांतून अन्य हिंदूंप्रमाणे दसराही साजरा होत असतो.
- रामकृष्ण विनायक अभ्यंकर,
2-46, भक्तियोग सोसायटी, परांजपे नगर,
वझिरा नाका, बोरिवली (प.), मुंबई 91
(संपर्क – 9819844710)

