रत्नागिरी : पुण्याच्या विश्व मराठी परिषदेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात सहा दिवसांची संस्कृती जागर परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. ती २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२२ या काळात होणार असून ऑननलाइन नोंदणीची अखेरची तारीख १५ ऑक्टोबर ही आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील प्रभानवल्लीपासून राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वर मंदिरापर्यंत पाच रात्री आणि ६ दिवस अशी एकूण ६ दिवसांची ही साहित्य संस्कृती जागर परिक्रमा आयोजित केली आहे. तरुणांना खर्या भारताची ओळख होण्यासाठी प्रत्यक्ष खेड्यात जाऊन तेथील संस्कृती आणि लोकजीवनाची अनुभूती घेण्यासाठी आणि तेथील ग्रामस्थ बंधूभगिनींबरोबर मनमोकळा संवाद साधून खरा भारत जाणून घेण्याची संधी या अनोख्या परिक्रमेतून मिळणार आहे. परिक्रमेला प्रवेश निःशुल्क असून प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र मिळेल.
परिक्रमेत १८ ते ३५ वयोगटातील १२५ बंधूभगिनींना प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीनंतर विश्व मराठी परिषदेतर्मे आपली निवड झाल्याचे कळविण्यात येईल.) परिक्रमेमेदरम्यान दररोज सुमारे १२ ते १५ किलोमीटर चालणे असेल. प्रभानवल्ली हा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि स्वराज्याला सर्वांत जास्त महसूल देणारा सुभा, खोरनिनको येथील मुचकुंदी नदीचा उगम आणि धरण, बल्लाळेश्वर मंदिर, शिवकालीन गढी, वेरवली, लांजा, ओणी, राजापूरची गंगा, उन्हाळे येथील गरम पाण्याचे झरे, इंग्रजांच्या वखारीचे अवशेष, प्राचीन धूतपापेश्वर मंदिर या प्रमुख स्थळांना भेट दिली जाईल. शाळा, आश्रम, मंदिर, गावकर्यांची घरे येथे राहण्याची सामुदायिक एकत्रित स्वरूपाची व्यवस्था आहे. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल.
निवासाच्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर चर्चा, गप्पा-गोष्टी आणि विचारांची देवाण-घेवाण, ग्रामीण कलांचे सादरीकरण, खेळ असा उपक्रम असेल. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आमळे, ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण, लेखक अतुल कहाते, नीलिमा बोरवणकर असे काही प्रसिद्ध साहित्यिक, कलाकार परिक्रमेत सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत निसर्गरम्य परिसरात चालण्याची संधी मिळेल.
निवासाच्या ठिकाणी आपले अंथरूण-पांघरूण स्वतः आणायचे आहे. ताटवाटी व्यवस्था आहे. चहा, नाश्ता आणि कोकणातील स्थानिक शाकाहारी साधे घरगुती भोजन दिले जाईल.
परिक्रमेला सुरुवात करण्यासाठी शुक्रवारी, २८ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजेपर्यंत साखरपा (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथे स्वखर्चाने पोहोचणे अपेक्षित आहे. पुणे ते साखरपा सशुल्क वाहन व्यवस्था करण्यात येईल. व्यक्तिगतरीत्या कोकण रेल्वे किंवा इतर वाहनाने तेथे पोहोचता येईल. एसटीने साखरपा बसस्थानक, तर रेल्वेने येण्यासाठी विलवडे हे जवळचे ठिकाण आहे. कोकणकन्या एक्स्प्रेस आणि तुतारी एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या विलवडे स्थानकावर थांबतात. तेथून प्रभानवल्लीचे अंतर २० किलोमीटर आहे.
परिक्रमा झाल्यावर प्रत्येक सहभागी व्यक्तींनी दोन हजार शब्दांमध्ये परिक्रमेतील अनुभवांवर आधारित प्रवासवर्णन, लेख, कथा अशा प्रकारचे साहित्य लिहावे, अशी अपेक्षा आहे. हे लेखन विश्व मराठी परिषदेतर्फे प्रकाशित केले जाईल. या उपक्रमाचे आयोजक विश्व मराठी परिषद ही संस्था असून अखिल भारतीय साहित्य परिषद आणि इतर काही संस्था सहकार्य करीत आहेत.
परिक्रमेमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाइटवर नोंदणी करावी. नोंदणीची अखेरची तारीख १५ ऑक्टोबर ही आहे. परिक्रमेची सविस्तर माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे. फोननवर संपर्क करण्यापूर्वी http://www.vishwamarathiparishad.org या वेबसाइटला भेट द्यावी, असे सूचित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अपूर्वा राऊत (९३०९४६२६२७) किंवा स्वाती यादव (९६७३९९८६००) यांच्याशी संपर्क साधावा.


