राज्यातील पहिले शासकीय टेलिमेडिसीन केंद्र माणगावमध्ये

गावातच मोफत उपलब्ध होणार अनेक वैद्यकीय चाचण्या आणि तपासण्या

सिंधुदुर्गनगरी : रेमिडी नोवा सोल्युशन्स किटचा माणगाव (ता. कुडाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज शुभारंभ करण्यात आला. टेलिमेडिसीनच्या माध्यमातून आजपासून सुरू करण्यात आलेल्या या सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना संजीवनी मिळेल. तसेच या नवीन सुविधेचा प्रचार आणि प्रसार करून सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज केले.

टेलिमेडिसीनच्या माध्यमातून ‘हेल्थ किट’ वापरणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. या यंत्रणेचा फायदा जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला होणार असून लवकरच शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ही यंत्रणा बसविली जाणार आहे. शासकीय स्तरावर अशा प्रकारची यंत्रणा बसवणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे. यापूर्वी संस्थास्तरावर पुणे आणि नंदुरबार येथे ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा या राज्यांमध्ये ही यंत्रणा आणि हेल्थ केअर किट कार्यरत आहे. सिंधुदुर्गनंतर रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड येथे टेलिमेडिसीनच्या माध्यमातून ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

राज्यातील गोरगरीब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैदयकीय तपासण्यांची सुविधा मोफत उपलब्ध व्हावी, यादृष्टीने पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी स्वखर्चाने न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीने विकसित केलेले रेमिडी नोवा सोल्युशन्स किट माणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करून दिले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते.

श्री. चव्हाण यावेळी म्हणाले, या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. या रुग्णसंख्येच्या तुलनेत डॉक्टर्स उपलब्ध करून देणे हे सरकारसमोरचे मोठे आव्हान आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात डिजटलायझेशनच्या दिशेने प्रगतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शहरांमध्ये असणारे काही चांगले विशेषज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी सेवा द्यायला तयार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही अशी सेवा चांगल्या डॉक्टरांमुळे उपलब्ध व्हायला लागली आहे. त्यामुळे ही रुग्णसेवा गरजू रुग्णांना देण्यात येत असून या व्यवस्थेमध्ये रुग्णांना होणारा उपचारांचा आणि औषधांचा खर्च कमी होण्याकरिता जेनेरिक मेडिसिनचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात कसा होईल यासाठीसुद्धा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे.

टेलिमेडिसीनची संपूर्ण कल्पना माणगाव आणि बांदा या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर अमलात आणण्यासाठी आम्ही सुरुवात केली आहे, असे सांगून श्री. चव्हाण पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा आणि जिल्ह्यातील ३८ गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी एक हेल्थ केअर किट उपलब्ध करून द्यावे. हा खर्च काही फार मोठा नाही. तो उचलण्यासाठी प्रत्येकाने जर थोडासा हातभार लावला, तरी डिजिटलाजेशनच्या माध्यमातून आरोग्याची नवीन व्यवस्था पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू होईल. त्यासाठी आपण सर्वांनी लवकरात लवकर प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे ही एक चांगली व्यवस्था टेलिमेडिसीनच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मिळू शकेल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सिंधुदुर्ग हा जिल्हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुदृढ होऊ शकेल.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे आदी उपस्थित होते.

काय आहे रेमिडी नोवा सोल्युशन्स किट?

रेमिडी नोवा सोल्युशन्स किट असे या अत्याधुनिक हेल्थ केअर किटचे नाव असून या किटमध्ये बॉडी टेंपरेचर, ब्लडप्रेशर, इसीजी तपासणी, पल्स ठोके, फुफ्फुसांची क्षमता, हृदयाचे ठोके, ग्लुकोज, कोलेस्टेरॉल तपासण्या, प्रेग्नन्सी टेस्ट, मलेरिया, डेंग्यूसारख्या रॅपीड टेस्ट आणि दहा प्रकारच्या युरिन टेस्ट करण्याची क्षमता आहे. त्यासाठी या किटमध्ये डिजिटल स्टेथेस्कोप, ब्लडप्रेशर मीटर, बॉडी टेंपरेचर मीटर, ऑक्सिमीटर, स्पायरो मीटर, इसीजी रीडर, ऑप्टिकल रीडर, लिपिड केअरसारखी अत्याधुनिक डिजिटल उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या किटसोबत कॉम्प्युटर मॉनिटर, स्कॅनर, प्रिंटर आणि नेट सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे किट हाताळण्यासाठी एका परिचारिकेला विशेष ट्रेनिंग दिले जाणार आहे. सुरुवातीला हे किट ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असले, तरी गरज पडल्यास दुर्गम गावांमध्ये रुग्णवाहिकेतून हे किट आणि टेक्निशियन पाठवून तेथील गरजू रुग्णांच्या आवश्यकतेनुसार सर्व तपासण्या मोफत करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे यापुढे ग्रामीण वा दुर्गम भागातील जनतेला आरोग्य तपासणीच्या दृष्टीने विशेष तपासणी करण्यासाठी आर्थिक झळ सोसून शहरात जाण्याची गरज पडणार नाही.

न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन प्रा. लि. या कंपनीचे संस्थापक सीईओ समीर सावरकर आणि संस्थापक सीओओ राजीव कुमार असून दोघेही बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे माजी विद्यार्थी आहेत. श्री समीर अशोका फेलोदेखील आहेत. न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही ISO13485-2016 आणि CE प्रमाणित, वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित उत्पादनांसह स्वदेशी वैद्यकीय उपकरणे तयार करणारी डिजिटल हेल्थकेअर कंपनी असून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग (DSIR) मान्यताप्राप्त अशी न्यूरोसिनॅप्टिकची R&D लॅब आहे. कंपनीने रेमिडी नोवा सोल्युशन्स किट हे उपकरण तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) आणि भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग ( BIRAC ) यांच्या सहकार्याने आविष्कृत केले आहे. विशेष म्हणजे कंपनीने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पूर्णतः भारतीय तंत्रज्ञान वापरून ते विकसित केले आहे.

न्यूरोसिनॅप्टिक गेली अनेक वर्षे ई-हेल्थ व एम-हेल्थ टेक्नॉलॉजी सोल्युशन्स या क्षेत्रात काम करत आहे. सामाजिक जबाबदारीचे भान राखून खासगी रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तसेच परदेशातही टेलिमेडिसीनच्या माध्यमातून कंपनीतर्फे याच प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. रेमिडी नोवा सोल्युशन्स किट हे भारतातील विविध राज्यांमध्ये उपलब्ध असून आजतागायत देशभरातील सुमारे २७०० ग्रामीण केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन्सला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मान्यता मिळाल्या आहेत. त्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्मचा टेक्नॉलॉजी पायोनियर, नॅसकॉम फाउंडेशनचा ज्यूरीज स्पेशल चॉइस आणि नुकताच मिळालेला रेड हॅरिंग ग्लोबल टॉप १०० कंपनीज अशा प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रातील न्यूरोसिनॅप्टिक ही एकमेव भारतीय कंपनी आहे. या कंपनीने टाइम मॅगझिनने गौरव केला आहे. माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांनी उदघाटन करून रेमिडी नोवा सोल्युशन्स किट राष्ट्राला समर्पित केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply