रत्नागिरीच्या पहिल्या जनता दरबारात ४०० अर्ज सादर

रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांनी पालकमंत्री म्हणून आज भरविलेल्या पहिल्या जनता दरबारात जिल्ह्यातून ४०० तक्रारदारांनी अर्ज सादर केले.

सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अधिकारी आणि राजकीय प्रतिनिधी यांच्यापर्यंत थेट पोहोचविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात आयोजित केलेल्या या जनता दरबारामध्ये ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते.

जनता दरबारामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जनतेच्या अडचणी सोडविणे हा माझा प्राधान्यक्रम असून आज जनता दरबाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेकडो जनसामान्यांच्या अडचणी जाणून घेता आल्या, याचे समाधान वाटते, असे त्यांनी सांगितले. जनता दरबारामध्ये प्राप्त झालेल्या अर्जांवर अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा दर आठ दिवसांनी घेण्यात येईल. आजच्या जनता दरबाराप्रमाणे दर महिन्याला जनता दरबाराचे आयोजन जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनीही जनतेच्या अडचणींचे निराकरण संबंधित स्तरावर करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रशासकीय कामकाजाच्या समस्या सोडविण्यासाठी डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. ती यंत्रणा सुरू करणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा असल्याची माहिती श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

आजच्या जनता दरबारात सादर झालेले अर्ज नगरपालिका, महावितरण, महसूल, क्रीडा, कामगार, वन विभाग, कृषि, शिक्षण, आरोग्य, गृह, मेरीटाईम बोर्ड, रोजगार हमी योजना इत्यादी विभागांशी संबंधित होते.

यावेळी लोटेमाळ येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेला स्वच्छ विद्यालयाचा प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महिला व बाल विकास विभागाच्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या लाभार्थी वैष्णवी सूरज पानकर, भैरवी सचिन भोळे, शांभवी सचिन भोळे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, मत्स्य, कृषि, आरोग्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अन्य विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply