चिनी भाषेतील ‘श्यामची आई’चे रविवारी मुंबईत प्रकाशन

तळेरे (ता. कणकवली) : साने गुरुजींच्या प्रसिद्ध ‘श्यामची आई’ या पुस्तकाचा आता चिनी भाषेत अनुवाद झाला असून त्याचे प्रकाशन ‘अनाम प्रेम’ तर्फे येत्या रविवारी (दि. २९ जानेवारी) मुंबईत होणार आहे. मूळच्या तळेरे (ता. कणकवली) येथील रसिका प्रभाकर पावसकर यांनी हा अनुवाद केला आहे.

भारतीय तरुणाईच्या मनात ‘श्यामची आई’ पुस्तकाने आईविषयी प्रेम, वात्सल्य, भक्ती निर्माण केली आहे. हे पुस्तक चिनी भाषेत अनुवादित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे गावाला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य असा समृद्ध वारसा आहे. हा वारसा आता रसिकाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. त्यांच्यामुळे पुन्हा एकदा तळेरे गाव आंतररष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.

रसिका प्रभाकर पावसकर या चीनच्या हनान प्रोविन्समधील “चंगचौ” (zhengzhou) युनिव्हर्सिटीत चिनी भाषा शिकवण्याचे पदवी शिक्षण घेत आहेत. एका व्रतस्थ व्यक्तीकडून झालेल्या मार्गदर्शनानुसार एका आईचे, पूज्य साने गुरुजींचे व समाजाचे ऋण म्हणून रसिका पावसकर यांच्याकडून “श्यामची आई” चिनी अनुवादित करण्यात येत आहे.

‘श्यामची आई’ ही कादंबरी पूज्य साने गुरुजी यांनी १९३३ मध्ये लिहिली असून मातेबद्दल असणारे प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना मांडलेल्या आहेत. या पुस्तकाच्या लाखो प्रती मराठी कुटुंबीय व इतर समाजातील लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. आचार्य अत्रे यांनी या पुस्तकाचे वर्णन मातृप्रेमाचे, महन्मंगल स्तोत्र असे केले आहे. या पुस्तकाला वाचकांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला. शिवाय आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या, १९५३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्यामची आई’ चित्रपटाद्वारे आईची महती घराघरात पोहोचली आहे. भारत सरकारने आयोजित केलेल्या पहिल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या सोहळ्यामध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून ‘गोल्डन लोटस’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

आईला देवता मानणारी अशी भारतीय संस्कृती आता परदेशातही पोहोचावी असा रसिका पावसकर यांचा मानस आहे. आई ही आईच असते. तिच्याबद्दल आपण व्यक्त होऊ शक्त नाही. आपले मन व हृदय तिच्या प्रेमाने भरलेले आहे. भारतीय आई आणि चिनी आई ही वेगळी नाही, भारतीय आईचे आणि चिनी आईचे आपल्या मुलांवरचे प्रेम सारखेच आहे. मोठे होण्यापेक्षा प्रत्येक आईच्या हृदयात प्रवेश करावा हे त्यांचे सांगणे आहे. हे आत्मसात व्हावे व त्यासाठीच त्यांनी या पुस्तकाची निवड केली.

“श्यामची आई”चा विविध भारतीय व परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. परंतु चिनी भाषेत आतापर्यंत अनुवाद झाला नव्हता. त्यामुळे अनाम प्रेम परिवारातील रसिका प्रभाकर पावसकर हिने “श्यामची आई” या मराठी साहित्यातील पवित्र महन्मंगल पुस्तकाचा चिनी भाषेमध्ये अनुवाद केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरातील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये रविवारी सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी मानद सचिव प्रा. डॉ. श्रीकांत बहुलकर, चायनीज युपेपे, जेन उपस्थित राहणार आहेत.

रसिका यांनी मुंबई विद्यापीठातून इंग्रजी विषयातील कला शाखेची पदवी प्राप्त केली असून चीनमध्ये हनान प्रोव्हिन्स चंगचौ (Zhengzhou) विद्यापीठामध्ये चायनीज भाषेमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहेत.

(निकेत पावसकर)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply