रत्नागिरी : भटक्या जाती आणि जमाती समितीचे माजी अध्यक्ष भिकुजी ऊर्फ दादा इदाते यांना केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री किताब घोषित केला. आज प्रजासत्ताक दिनी त्यांचा पहिला सत्कार रत्नागिरीत करण्यात आला.
श्री. इदाते यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार ही सर्व जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. त्यांच्याच हस्ते श्री. इदाते यांचा सत्कार येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर झालेल्या प्रजासत्ताक दिन समारंभात करण्यात आला. जिल्हयाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रांत अग्रणी व्हावा, या दृष्टिकोनातून शासन कटिबद्ध आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री या नात्याने शुभेच्छा देताना मला विशेष आनंद आहे, असे पालकमंत्री म्हणाले. राज्यात रत्नागिरीवासीयांइतका उत्साही प्रतिसाद कुठेच नसेल, असे सांगून सोहळ्याला आलेल्या नागरिकांचे त्यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार सोहळ्यात पोलिस दलांसह होमगार्ड, एनसीसी, ग्रीन आर्मी आणि कोकणी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पथकांसह चित्ररथांचे संचलन झाले. विविध गुणवंताचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media