Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी जिल्ह्यात घुमतोय ‘होलिओ’चा गजर

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. सणातील शेवटचा दहावा होम मंगळवारी (दि. ७ मार्च) रोजी पेटवला जाणार आहे. जिल्ह्यातील १ हजार ३१५ सार्वजनिक आणि २ हजार ८५४ खासगी होळ्यांचा शेवट उद्या होईल.

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव मोठा सण म्हणून साजरा केला जातो. परजिल्ह्यांतून चाकरमानी या सणासाठी आवर्जून आपापल्या गावाकडे येतात. गेल्या २४ फेब्रुवारीपासून फाक पंचमीपासून होळीच्या उत्सवाला प्रारंभ झाला. होळी पेटविताना होलिओचा गजर केला जातो. शिमगोत्सवात ग्रामदेवता पालख्यांमधून घरोघरी येत असतात. या देवतांच्या दर्शनासाठी प्रत्येकजण आतुरलेला असतो. जिल्ह्यात एक हजार ३९९ सजलेल्या पालख्यांमधून देव दर्शन देतात.

उद्या शेवटची होळी पेटल्यानंतर ग्रामदेवतांच्या पालख्या सहाणेवर विराजमान होतात. या ठिकाणी या देवतांचा मांड भरवला जातो. पालख्या नाचविल्या जातात. त्याचबरोबर येथे विविध पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यातील काही ग्रामदेवतांच्या पालख्या रंगपंचमीच्या दिवशी, काही पालख्या गुढी पाडव्यानंतर मंदिरांमध्ये परततात. या संपूर्ण शिमगोत्सवाच्या काळात खेळे, नमनातील सोंगे (संकासूर) हा एक आकर्षक कलाप्रकार पाहावयास मिळतो. तो ठिकठिकाणी सुरू झाला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version