चिपळूण : महिलांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करताना केवळ आर्थिक समृद्ध न साधता आत्मविश्वास आणि निर्णयप्रक्रियेतही आत्मनिर्भरता गरजेची आहे, असे प्रतिपादन मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा आणि पत्रकार सौ. उमा सुरेश प्रभू यांनी केले.
चिपळूण येथे कौशल्य विकास मेळाव्यात त्या बोलत होत्या. कौशल्य विकासातून आत्मनिर्भतेकडे हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेली मानव साधन विकास संस्था आणि जन शिक्षण संस्थानतर्फे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्यात बोलताना सौ. प्रभू म्हणाल्या की, महिला सर्वार्थाने आत्मनिर्भर झाल्यास पुढील पिढी घडविण्याची जबाबदारी महिला यशस्वीरीत्या पार पाडतील. कुशल महिलांच्या उपजिविका विकासासाठी जनशिक्षण संस्थान कटीबद्ध आहे.
यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी स्थापन केलेल्या मानव साधन विकास संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात भविष्यात राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. सौ. प्रभू तळागाळातील लोकांसाठी मानव साधन विकास संस्थेच्या माध्यमातून गेली २० वर्षे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई येथे कृतिशील आहेत. तसेच त्या ‘इफ्को टोकिओ’ या कंपनीच्या संचालक मंडळावर असून कंपनीच्या सीएसआर अध्यक्षा आहेत.
रत्नागिरी जनशिक्षण संस्थानचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि भविष्यातील नियोजनाची मांडणी केली. दापोलीतील शेतीतज्ज्ञ विनायक तथा काका महाजन यांनी या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील कौशल्यप्राप्त लाभार्थ्यांच्या हाताला काम मिळून उत्पादन व्यवस्थेशी जोडलेली व्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपाध्यक्ष व अपना सहकारी बँकेच्या संचालक अदिती सावंत यांनी प्रशिक्षणार्थीचे अभिनंदन केले आणि उद्योग व्यवसाय निर्मितीसाठी जन शिक्षण संस्थान आपल्यासोबत असेल, असे आश्वासन दिले. कौशल्य विकासापासून सुरू झालेला हा अश्वमेध लाभार्थ्यांच्या समृद्धीपर्यंत पोहोचेल, असा विश्वास संस्थेच्या संचालक सीमा यादव यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला. जन शिक्षण संस्थान ही योजना भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातर्फे राबविण्यात येते. गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेचे काम सुरू झाले आहे. ही योजना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी स्थापन केलेल्या मानव साधन विकास संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात राबवली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे चेअरमन म्हणून माजी आमदार डॉ. विनय नातू काम पाहत आहेत. सहा महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतून ८० प्रशिक्षणांमधून एक हजार ६०० लाभार्थ्यांपर्यंत ही योजना यशस्वीपणे पोहोचली आहे, असेही त्यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत काम करणारी ४६ सेन्टर्स, १९ संस्था, ५६ प्रशिक्षक यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
मेळाव्यात साडेतीनशेहून अधिक प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. तसेच प्रशिक्षक महिलांनी जनशिक्षण संस्थान योजनेवरील पथनाट्य तर प्रशिक्षणार्थींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमास जन शिक्षण संस्थानचे सेक्रेटरी अॅड. हर्षद भडभडे, विश्वस्त बबनराव पटवर्धन, महेश गर्दे, डीबीजे महाविद्यालयाच्या प्रा. सोनाली खर्चे, खेडच्या यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय देसाई, उमा म्हाडदळकर, जहूर बोट, मिहिर महाजन, केतकी कारेकर, शिक्षक पत्रकार गौरव पोंक्षे आदी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

