पोंभुर्ले (ता. देवगड) : यावर्षीचा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना जाहीर करण्यात आला आहे.
येत्या ६ जानेवारी २०२४ रोजी पोंभुर्ले (देवगड, सिंधुदुर्ग) येथे हा आणि अन्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी केली.
फलटण येथील महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेच्या वतीने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या तिसाव्या राज्यस्तरीय प्रतिष्ठेच्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष श्री. बेडकिहाळ यांनी पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात केली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहणे म्हणून कणकवली येथील गोपुरी आश्रमाचे संचालक प्रा. राजेंद्र मुंबरकर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेचे कार्यवाह कवी ताराचंद्र आवळे, मधुकर जांभेकर, सुधाकर जांभेकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विश्वस्त अलका बेडकीहाळ, गजानन पारखे, अमर शेंडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्रा. राजेंद्र मुंबरकर यांच्या हस्ते जांभेकरांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मराठी पत्रकारांच्या कार्याचा सन्मान म्हणून संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण १९९३ पासून केले जात असल्याचे श्री. बेडकीहाळ यांनी सांगितले. तसेच यंदाचे पुरस्कार जाहीर केले.
हे पुरस्कार असे – ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, साहित्यिक गौरव दर्पण पुरस्कार नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व अभ्यास केंद्राचे संचालक भगवान लक्ष्मणराव अंजनीकर, कराड येथील ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील पुरस्कृत धाडसी पत्रकार दर्पण पुरस्कार कृतिका (श्वेता) पालव – मुख्य संपादिका “धावती मुंबई’ व ‘सन्मान महाराष्ट्र न्यूज’, डोंबिवली). राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार – प्रशांत कदम (विशेष प्रतिनिधी, ‘एबीपी माझा’, नवी दिल्ली), डॉ. सागर देशपांडे (उपसंपादक, दैनिक ‘लोकमत’, कोल्हापूर), श्रीकांत कात्रे (आवृत्ती प्रमुख, ‘प्रभात’, सातारा), शशिकांत सोनवलकर (बातमीदार, दै. ‘सकाळ’, दुधेबावी, ता. फलटण), विक्रम चोरमले (प्रतिनिधी ‘दै. सत्य सह्याद्री, फलटण).
दर्पण पुरस्काराचे स्वरूप रोख २,५०० रुपये आणि सन्मानपत्र, जांभेकर चरित्र, ग्रंथ आणि माहितीपट, शाल, श्रीफळ असे असून या सर्व पुरस्कारांचे वितरण राज्यस्तरीय पत्रकार दिनी ६ जानेवारी २०२४ रोजी पोंभुर्ले येथील संस्थेच्या ‘दर्पण’ सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. बेडकिहाळ यांनी सांगितले.
(महाराष्ट्राच्या आधुनिकतेचे अग्रदूत ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर; लेखक : यशवंत पाध्ये; प्रकाशक : राजे पब्लिकेशन्स) (हे पुस्तक ‘ई-बुक’ स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media



