रत्नागिरी : माणसाच्या हातात धारदार शस्त्र असण्यापेक्षा मन धारदार विचारांनी मजबूत असायला हवे. संपूर्ण जग लिंगभेद मानत नसताना मुली असुरक्षित असणे दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी केले.
राज्य शासनाचा महिला आणि बालविकास कक्ष तसेच नवनिर्माण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेच्या बृहत भारतीय सभागृहात आज या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील १००० मुलींना येत्या ८ जुलैपर्यंत स्वसंरक्षणाचे धडे आणि प्रात्यक्षिक शिकवले जाणार आहे. कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय उद्घाटन नवनिर्माण संस्थेच्या सभागृहात झाले. यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, महिला व बालविकास विभागाचे आर. बी. काटकर, सायबरसेलचे नितीन पुरळकर, नजमा मुजावर, भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या समुपदेशक जान्हवी पाटील आदी उपस्थित होते.
श्री. हेगशेट्ये पुढे म्हणाले, सोळाव्या शतकात महिलांच्या सुरक्षित जीवनाचे धडे राजमाता जिजाऊंच्या तालमीत छत्रपती शिवरायांनी गिरवले. त्याचा परिणाम असा झाला की, शिवरायांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्याचे हातपाय कलम केले. अशी शिक्षा दिल्याने त्यावेळी कोणाचे महिलांवर अत्याचार करण्याचे धाडस झाले नाही. महिलेचे संरक्षण करणे आणि तिचा सन्मान करणे हा वारसा सोळाव्या शतकापासून महाराष्ट्राला शिवरायांनी घालून दिला आहे. हाच वारसा जपायला हवा. तो जपताना महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर आणि तात्काळ शासन व्हायला हवे.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन केले. मुलींनी आपली माहिती उघड करणे धोकादायक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आईवडील हेच आपले पहिले मित्र असल्याने आपल्यावर अत्याचार होत असेल तर आईवडिलांना विश्वासात घेऊन सांगायला हवे. त्याचवेळी पोलीस हेल्पलाइन ११२ या क्रमांकावर संपर्क साधायला हवा. तसे केल्यास पोलीस तक्रार केल्यापासून आठ ते दहा मिनिटांत तुमच्या मदतीला येतील आणि पोलीस आले नाहीत तर आमच्याकडे तक्रार करा. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी हमी त्यांनी दिली.
प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी मनोगत व्यक्त करून मुलींचे मनोबल वाढविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. बी. काटकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. सुशील साळवी यांनी केले. आभार प्रा. पूर्णिमा सरदेसाई यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

