रत्नागिरी : येथील संगीतकार अवधूत बाम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर येत्या ९ जुलै रोजी मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमात कलाप्रवास उलगडणार आहेत.
श्री. बाम यांची मुलाखत आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी या कार्यक्रमात प्रक्षेपित होणार आहेत. रविवारी रात्री साडेआठ वाजता हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे. कोकणातील एकमेव ए ग्रेड संगीतकार होण्यापर्यंतचा अवधूत बाम यांचा प्रवास, दिग्गज गायक, वादक यांचे त्यांना मिळालेले मार्गदर्शन, त्यांचे गुरू इत्यादीबाबत दिलखुलास गप्पा या कार्यक्रमातून पाहायला मिळणार आहेत. सुप्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर श्री. बाम यांच्याशी हा संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमात अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेल्या विविधांगी गीतरचना त्यांचे शिष्य स्वप्नील गोरे आणि आसावरी निगुडकर सादर करणार आहेत. त्यांच्यासाठी अनुया बाम यांनी सहगायन केले असून युवा वादक श्रीरंग जोगळेकर हार्मोनियम, तर प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर तबलासाथ करणार आहेत. या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण १६ जुलै रोजी सकाळी दहा आणि संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर होणार आहे. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमाची निर्मिती अमित कुमार यांची असून महेंद्र जगताप यांनी त्यांना साह्य केले आहे.
Follow Kokan Media on Social Media

