डॉ. तेजानंद गणपत्ये कोकणातील पहिले आयर्नमॅन

चिपळूण : चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी गेल्या २ जुलै रोजी कझाकिस्तान येथे झालेल्या फुल आयर्नमॅन (140.3) स्पर्धेत भाग घेऊन ही खडतर स्पर्धा दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण करत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

आयर्नमॅन होण्याकरिता पोहणे, सायकलिंग आणि धावणे या तिन्ही कृती एकापाठोपाठ करावयाच्या असतात. डॉ. तेजानंद यांनी खालीलप्रमाणे वेळ नोंदवली. पोहणे – ३.८ किलोमीटर (१ तास ४५ मिनिटे), सायकलिंग – १८० किलोमीटर (७ तास ४४ मिनिटे), धावणे – ४२.२ किलोमीटर (५ तास २९ मिनिटे). हे तिन्ही क्रीडा प्रकार १६ तास ३० मिनिटांमध्ये पूर्ण करायचे असतात. डॉ. तेजानंद यांनी १५ तास १७ मिनिटे या वेळेत एकंदर २२६.७ किमी अंतर पार केले.

कझाकिस्तान येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये जगभरातील ६० देशांमधून २३६ स्पर्धक सहभागी झाले होते. नदीचे अतिशय थंड पाणी, सायकलिंग करताना समोरून येणारा जोरदार वारा, तसेच दुपारच्या कडक उन्हात धावणे या आव्हानांचा सामना डॉ. गणपत्ये यांना स्पर्धेदरम्यान करावा लागला.

डॉ. गणपत्ये यांनी कर्करोगावर मात करून दोन वर्षे कठोर प्रयत्न केले. त्यांच्या घशात २०१९ मध्ये गाठ आढळली आणि कर्करोगाचे निदान झाले. मुंबईत जाऊन केमोथेरपी, सर्व उपचार पूर्ण केले. पत्नी डॉ. अश्विनी अतिशय खंबीरपणे पाठीशी उभी राहिली. कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी पाठबळ दिले. आजारमुक्त झाल्यावर वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली. आणि मित्रांसोबत सायकलिंग सुरू केले. पोहणे, सायकलिंगचा नियमित सराव पुन्हा सुरू केला. चिपळूण सायकलिंग क्लबने मोठा पाठिंबा दिला. केमोनंतर वर्षभरात अशक्यप्राय वाटणारी बीआरएम त्यांनी पूर्ण केली. धावणे, कोल्हापूरचे आयर्नमॅन पंकज रावळू यांच्याकडे मार्गदर्शन घेऊन प्रशिक्षण सुरू केले. रोज एक ते दीड तास सराव, शनिवार-रविवार २ ते ३ तास सराव असा त्यांचा दिनक्रम होता. कागल येथे ऑलिंपिक डिस्टन्स, नगर येथे २१ किलोमीटर रनिंग हाफ मॅरेथॉन, ऑलिंपिक डिस्टन्स ट्रायथलोन (बेळगाव) आणि पुणे, कोल्हापूर, सातारा येथे ३ हाफ मॅरेथॉन, कोल्हापूर येथे हाफ आयर्नमॅन डिस्टन्स ट्रायथलॉन स्पर्धा त्यांनी पूर्ण केल्या. त्यानंतर कझाकिस्तान येथे यश मिळवून आयर्नमॅन होण्याचा मान मिळवला.

डॉ. गणपत्ये यांनी कोकणातील पहिला आयर्नमॅन बनण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांच्यावर संपूर्ण कोकणातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. तेजानंद गणपत्ये यांच्या कामगिरीचा आदर्श घेत कोकण विभागातून भविष्यात नवनवीन आयर्नमॅन घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply