Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सर्वाधिक उजाड महामार्ग?

Advertisements

अनेक वर्षे रखडलेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होऊन संपूर्ण महामार्ग खुला होईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. महामार्गाचे काम यथावकाश पूर्ण होईलच, पण महामार्गाची निर्मिती करण्यापूर्वी हा महामार्ग हरित महामार्ग होईल असे दिलेले आश्वासन मात्र पूर्ण होण्याबाबत शंका आहे. उलट कोकणासारख्या निसर्गसंपन्न भागातील हा महामार्ग देशभरातील सर्वांत उजाड महामार्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारने २०१५ साली हरित महामार्ग धोरण जाहीर केले. जेथे जेथे महामार्ग होतील, तेथे महामार्गाच्या दुतर्फा किंवा मध्यभागी झाडे लावणे, शक्य असेल तेथे आधीची झाडे जतन करणे, महामार्गाच्या सौंदर्यात भर घालील अशा पद्धतीने वृक्षारोपण करणे हे या धोरणाचे वैशिष्ट्य होते. अशा तऱ्हेने सुमारे एक लाख किलोमीटर लांबीचे महामार्ग देशभरात होऊ घातले आहेत. प्रत्येक महामार्गाकरिता येणाऱ्या एकूण खर्चाच्या एक टक्का रक्कम वृक्षारोपणाकरिता बाजूला ठेवली जाईल. ही रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केली जाईल आणि त्यामार्फत वृक्षारोपण केले जाईल. त्या त्या भागातील स्थानिक प्रजातींची झाडे आणि पर्यावरणपूरक वनस्पतींची लागवड करण्याचा कटाक्ष बाळगला जाईल, असेही या धोरणात नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यादृष्टीने कोणतीच हालचाल होत नाही.

मुंबई-गोवा महामार्गाच्या अंतिम टप्प्यात आलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे जेथे काम पूर्ण झाले आहे, तेथे वृक्षारोपणाची मोहीम राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाती घेतली आहे. मात्र ही झाडे लावताना जलद वाढणारी, तरीही मोठ्या प्रमाणावर पाणी शोषून घेणारी तसेच स्थानिक पर्यावरणाची हानी करणारी परदेशी झाडे लावण्याकडे कल आहे. चिपळूणचे सामाजिक कार्यकर्ते शहानवाज शाह यांनी चिपळूण तालुक्यात पेढे येथे लावलेली गुलमोहराची झाडे काढायला लावली आणि देशी जातीच्या झाडांची लागवड करण्याची सूचना केली. वास्तविक एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने अशी सूचना करण्याची वेळच येऊ नये. श्री. शाह पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक असल्यामुळे त्यांनी तेथे परदेशी झाडांच्या लागवडीला विरोध केला. पण संपूर्ण राष्ट्रीय महामार्गावर अशी लागवड होणार आहे, हे लक्षात घेऊन आता त्यासाठीची चळवळ उभी करायला हवी.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सुरुवातीला दहा हजार कोटी रुपयांचा अंदाज करण्यात आला होता. तो नंतर वाढला, तरी मूळ किमतीच्या एक टक्का म्हणजे शंभर कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे दिले गेले असतील, असे गृहीत धरायला हवे. त्यातून नेमकी किती, कुठे आणि कशी लागवड झाली, याचाही शोध घ्यायला हवा. सामाजिक वनीकरण विभागाने काही वर्षांपूर्वी अ‍ॅकॅशिया आणि निलगिरीच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. त्यामुळे सगळीकडे हिरवळ दिसू लागली, तरी ही परदेशी झाडे कोकणाच्या पर्यावरणाला पूरक नव्हती, हे नंतर सिद्ध झाले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लक्षावधी झाडे तोडली गेली. ती सर्व स्थानिक प्रजातीची होती. त्यामुळे नव्याने लागवड करताना स्थानिक प्रजातीचीच झाडे लावली गेली पाहिजेत. विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन वृक्षलागवडीसाठी मदत करावी, असे आवाहन मध्यंतरी नितीन गडकरी यांनी केले होते. पण त्यापेक्षाही शासनामार्फत केल्या जाणाऱ्या लागवडीवर लक्ष ठेवण्यासाठी अशा संघटनांनी एकत्र आले पाहिजे. अन्यथा वैशिष्ट्यपूर्ण निसर्ग लाभलेल्या कोकणात परदेशी झाडांची लागवड झाली, तर पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होणार असून मुंबई-गोवा महामार्ग देशभरातील सर्वाधिक उजाड महामार्ग ठरेल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version