मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत टोल नाही

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या सुरू असून संपूर्ण मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत या महामार्गावर टोल वसूल केला जाणार नाही. कोकण महामार्ग अभियानाला मोठे यश आले असून त्याकरिता कायदेशीर संघर्ष करणारे वकील चिपळूणचे सुपुत्र ओवेस पेचकर यांचे अभियानातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

जोपर्यंत संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसूल करू नये, अशी मागणी श्री. पेचकर यांनी केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत राज्य शासनाने तसे हमीपत्र सादर केले आहे. जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल वसूल केला जाणार नाही, असे त्या पत्रात म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर ९ जुलै रोजी सुनावणी झाली. महामार्गावर पावसाळ्यात पडलेले खड्डे, वाशिष्ठी नदीचा रखडलेला पूल, जुन्या पुलाची दैना याबाबतचे निवेदन श्री. पेचकर यांनी केले. मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पावसाळ्यात पडलेले खड्डे भरून घ्यावेत तसेच वाशिष्ठी नदीच्या पुलावरून प्रवास करण्याकरता सुरक्षिततेची काळजी म्हणून हॅलोजन लाइट, सेफ्टी लाइट, रिफ्लेक्टर इंडिकेटर त्वरित लावून पूर्तता अहवाल येत्या ३१ पूर्वी उच्च न्यायालयात सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले. अॅड. पेचकर यांनी चिपळूण शहरालगतच्या महामार्गाच्या सांडपाण्याचा विषयही मांडला. महामार्गाची उंची वाढल्यामुळे सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न आहे. या पाण्यामुळे शहरात सांडपाण्याचा पूर येण्याची शक्यता आहे. ही बाब राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना न्यायालयाने दिले.

१६ जुलैला ऑनलाइन कोकण महामार्ग जनआंदोलन परिषद

याबाबत समितीचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी सांगितले की, कोकण महामार्ग समन्वय समितीने सातत्याने आपल्या अभियानाच्या आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या लावून धरल्या, तर शासकीय यंत्रणांना त्यावर काम करावेच लागेल. त्यामुळे संघटितपणे कोकणावर होणाऱ्या अन्यायाबद्दल सातत्याने बोलणे आवश्यक आहे. आवश्यक तेथे न्यायालयातून न्याय मिळवणे गरजेचे आहे. संपूर्ण कोकणासाठी एकत्रित आवाज उठवण्याचे काम कोकण महामार्ग समन्वय समिती करणार आहे. कोकणातील अनेक सामाजिक संस्था, मुंबईकर ग्रामस्थ मंडळे, शिक्षण संस्था कोकण महामार्ग अभियानात आणि जनआंदोलनात सहभागी होत आहेत. याचाच एक भाग म्हणून येत्या १६ जुलै रोजी ऑनलाइन कोकण हायवे जनआंदोलन परिषद आयोजित केली जाणार आहे. यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत कोकण महामार्ग समितीच्या मागण्या आणि अभियान पोहोचवण्यासाठी या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. यादवराव यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply