करोनाने काहीच शिकवले नाही?

करोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले. या आजाराने संपूर्ण जगच बदलून गेले. व्यक्तिगत नातेसंबंधांवर तर या आजाराने खूपच परिणाम केला. अगदी जवळच्या नातलगाला करोनाची बाधा झाली असेल तरी त्याच्यापासून फार दूर राहावे लागत होते. प्रसंगी तो मरण पावला, तर अखेरचे दर्शनही दुर्लभ होते. करोनामुळे निर्माण झालेली भीती हा तर फारच मोठा विषय आहे. अनेक नाती या करोनाने तोडली, पण जिवाभावाचा नसलेला, काहीही संबंध नसलेला, स्वतःच्या धर्मातला नसलेलासुद्धा एखादा करोनायोद्धा अखेरची मूठमाती देतो, असे चित्रही करोनाच्या काळात दिसले. माणुसकीची नवीन नाती निर्माण झाली. सर्वच क्षेत्राला व्यापून टाकलेल्या या करोनाने खूप लोकांना बरेच काही शिकवले, असे सांगितले जाते. पण काही लोक मात्र त्यापासून फारच दूर राहतात. परंपरांना चिकटून बसतात. प्रथांना कवटाळून बसतात आणि माणुसकी नष्ट झाल्याचा पुरावाही मिळतो.

राजापूर तालुक्यात माय राजापूर ही सामाजिक संस्था वेगळे काम करत आहे. दुःखितांसाठी पुढे येणे, आवश्यक ती मदत करणे अशा स्वरूपाचे या संस्थेचे काम आहे. करोनाच्या काळातही या संस्थेने खूप काम केले. ते इतरांनाही आदर्श आहे. करोनामुळे ज्यांनी मातृछत्र हरपले, अशी अल्पवयीन मुले पोरकी झाली. त्यांच्यासाठी काम करायचे या संस्थेने ठरवले. त्यासाठी संपूर्ण तालुका अक्षरशः पिंजून काढला. दोन्ही पालक गमावले असतील तर त्यांच्यासाठी शासनाने पाच लाखाची ठेव ठेवण्याची तरतूद केली, पण एकच पालक त्यातही पिता गमावला असेल, तर ते संपूर्ण कुटुंब कोलमडून पडते. घरातला कर्ता माणूस निघून गेला तर मागे राहिलेल्यांनी जगायचे कसे, हा प्रश्न आहे. त्यांना शासनाच्या निकषानुसार कोणतीही मदत मिळणार नाही. पण त्यांना वाऱ्यावर सोडायचे का, या विचाराने माय राजापूर संस्थेची मंडळी अस्वस्थ झाली. त्यांनी पूर्ण तालुका पिंजून काढून शक्य असेल तेवढी मदत पदरमोड करून दिली. पण त्यांनाही काही मर्यादा आहेत.

हा शोध घेत असतानाच काही प्रथा-परंपरांचे भयानक वास्तव त्यांच्यासमोर आले. एका गावात दुकान चालवून एक कुटुंब उदरनिर्वाह करत असे. पण या कुटुंबाचा प्रमुख करोनामुळे मरण पावला. या दुकानदाराची पत्नी दुकानात जायला, ते चालवायला सक्षम आहे. तिने तशी तयारीही दाखवली. पण तेथे काही अनिष्ट प्रथा आडव्या आल्या.

त्या तरुणीने दुकान चालवायचे ठरवले खरे, पण काही जणांनी तिला त्यापासून परावृत्त केले, नवरा गेल्याचे तुला दुःख वाटत नाही का, एक वर्षभर तरी तुला काही करता येणार नाही. ते केले तर ते योग्य दिसणार नाही, असे सांगून तिला घरातच बसवून ठेवण्यात आले आहे. नवरा गेल्याचे दुःख तिला झाले असणारच. पण गेला तो परत येणार नाही हे नक्की असेल, तर राहिलेल्या कुटुंबीयांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी त्या स्त्रीवरच येऊन पडली आहे. ती पेलायला ती समर्थ आहे. तिला प्रोत्साहन देण्याऐवजी चुकीच्या प्रथेत तिला बांधून ठेवणे माणुसकीच्या दृष्टीने अत्यंत अयोग्य आहे. करोनाने अशा परंपरांचा पगडा असलेल्या माणसांना काहीच शिकवले नाही काय, असा प्रश्न त्यातून निर्माण होतो. याबाबत प्रबोधन कोणी करायचे हाही प्रश्नच आहे. कारण परंपरांचा पगडा इतका असतो की त्यांना कोणी काही सांगायला गेले तर त्या माणसालाच वाळीत टाकले जाण्याची शक्यता असते. चुकीच्या प्रथा बाजूला सारून माणसाच्या जगण्याला महत्त्व दिले पाहिजे, असा धडा करोनाने दिला आहे. पण तो शिकायचे ठरवले, तरच त्याचा उपयोग आहे. अनिष्ट प्रथा कवटाळून बसणाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी, अशीच अपेक्षा आहे

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ९ जुलै २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा ९ जुलैचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply