रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम १७ वर्षांपासून रखडले असून, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे मराठी पत्रकार परिषदेकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले होते. ‘महामार्गाचे खड्डे झाले खोल, अपूर्ण कामाचा सरकारवर बोल’, ‘कोकणवासीयांच्या जीवाशी खेळणे बंद करा, मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करा’ अशा घोषणा पत्रकारांनी दिल्या.
या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट सरकारचे लक्ष वेधून घेणे हे होते. गेली अनेक वर्षे हा महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे सतत अपघात होत असून, यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. हा महामार्ग वेळेत पूर्ण करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषद सुरुवातीपासूनच करत आहे; मात्र सरकारकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने पत्रकारांनी शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी थेट रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनात ‘यमदूता’ची भूमिका साकारणाऱ्या एका पत्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला तो ‘सावकाश जा, पुढे खड्डे आहेत’ असा संदेश देत होता. यामुळे या आंदोलनाला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आणि महामार्गाची भीषण स्थिती अधिक प्रभावीपणे मांडली गेली.
कोकणी जनतेला सरकारकडून केवळ आश्वासने मिळाली आहेत, अनेक डेडलाइन्स देण्यात आल्या; मात्र त्यापैकी एकही डेडलाईन पाळली गेली नाही, असा आरोप पत्रकारांनी केला. अनेक सार्वजनिक बांधकाम मंत्री बदलले, त्यांनी फक्त पाहणी दौरे केले; पण मुंबई-गोवा महामार्ग मात्र रखडलेलाच आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही पाहणी दौरा केला होता, तेव्हाही कोकणी जनतेला फक्त आश्वासनेच मिळाली. सरकार कोकणी जनतेच्या सहनशीलतेचा अंत किती दिवस पाहणार, असा संतप्त सवालही पत्रकारांनी उपस्थित केला.
पोलिसांनीही या आंदोलनाला सहकार्य केले आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या आंदोलनामुळे मुंबई-गोवा महामार्गाची सद्यस्थिती आणि त्यामुळे होणारे हाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता तरी सरकार या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने मार्ग पूर्ण करेल, अशी अपेक्षा कोकणवासीय व्यक्त करत आहेत. या वेळी रत्नागिरी, लांजा तालुक्यातील मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media







