मधउत्पादकांसाठी राजापूरला १० ऑगस्ट रोजी मेळावा

राजापूर : मधाच्या उत्पादकांसाठी आणि त्या क्षेत्रातील संधी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी येत्या १० ऑगस्ट रोजी राजापूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १८ जून २०१९ च्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित झाली आहे. याकरिता पात्र व्यक्ती आणि संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशी संरक्षण आणि संवर्धनाची जनजागृती ही या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

वैयक्तिक मधपाळ, केंद्रचालक, प्रगतिशील मधपाळ, शेतकरी आणि इतर इच्छुक लाभार्थी या योजनेतील प्रमुख घटक आहेत. मधमाशी पालन योजना, प्रात्यक्षिक माहिती तसेच मुख्यमंत्री व पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना मेळावा राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ राबवत असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी येत्या गुरुवारी, १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत राजापूरच्या नगर वाचनालय सभागृहात रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा मोफत असून सर्वांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तसेच राजापूर तालुका बहुद्देशीय औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुनील जठार यांनी सर्व संचालक मंडळाच्या वतीने केले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय रत्नागिरी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जेल रोड, रत्नागिरी (दूरध्वनी ०२३५२-२२२३७९) किंवा सुनील जठार (९२७०५७९४००) यांच्याशी संपर्क साधावा.

कोकण विभागात जंगल, फळबाग क्षेत्र अशी वैशिष्ट्यपूर्ण निसर्ग संपदा असल्याने मध उद्योगाच्या विकासाला मोठा वाव आहे. शेतकऱ्यांनी स्वतंत्रपणे शेतीपूरक मध उद्योग सुरू केल्यास चांगली अर्थप्राप्ती होऊ शकते. त्यामुळे कोकणातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मध उद्योग करण्यास प्रवृत्त व्हावे, असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply