रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी, दैवज्ञ हितवर्धक समाज रत्नागिरी आणि निरामय योग केंद्र रत्नागिरी यांच्यातर्फे १९ ऑगस्ट २०२३ रोजी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला प्रमोद खेडेकर, दत्तप्रसाद केळुसकर, गणेश धुरी, फईजअली फडनाईक, संतोष खेडेकर यांच्यासह शंभरहून अधिक साधकांनी हजेरी लावली.
सकाळी सहा ते आठ या वेळेत रत्नागिरीतील नाचणे रोडवरील दैवज्ञ भवन सभागृहात हे योग शिबिर झाले. या योग शिबिरामध्ये पतंजली योगपीठाचे आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त ज्येष्ठ योगगुरू श्री. वीरूस्वामी यांनी योग आणि प्राणायाम याबाबत प्रात्यक्षिकांसह उत्तम मार्गदर्शन केले.
यामध्ये रोगानुसार योगमार्गदर्शन, फिजिओथेरपी आणि अॅक्युप्रेशर मार्गदर्शन यांचा समावेश होता. कंबरदुखी, गुडघेदुखी, रक्तदाब, शुगर, थायरॉइड, स्त्रियांचे आजार आदींवरही योगासनांद्वारे उपचार कसे शक्य आहेत, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
‘निरामय’च्या अनेक नियमित योग साधकांनी आपले योगासंदर्भातील अनुभव शेअर केले. १० ते १५ वर्षे घेत असलेली बीपी, शुगर, हार्ट, मणक्याचे विकार आदी असाध्य आजारांवरची औषधे बंद झाली आहेत, असे अनुभव अनेकांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी योगगुरू वीरूस्वामी यांनी सगळ्यांना नियमित योगसाधना करून निरोगी राहण्याचा मोलाचा सल्ला दिला.



