आचरा (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक आणि ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांचे मामा सदानंद काशिनाथ सामंत (नमस) यांना नुकतीच देवाज्ञा झाली. त्यांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला, आजोळच्या समृद्ध आठवणी जागवणारा हा लेख…
…..
रविवारी, २० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळीच माझ्या बहिणीचा कुडाळवरून फोन आला. ‘भाऊमामा गेले!’ दोन शब्दांचे ते छोटे वाक्य! मी चार महिने अपेक्षित होतो; पण का कुणास ठाऊक भाऊमामाला देवाज्ञा झाली ही बातमी ऐकून माझ्या मनात पूर्वीचे आजोळ साकारले आणि तोंडातून शब्द आले, ‘आजोळच्या माझ्या विशाल मावळेवसाची एकुलती एक ‘धाकटी पाती’ निमाली! नमशीचे मागील दार शांत शांत झाले!’
भाऊमामा हा माझा सख्खा-चुलत मामा. सदानंद काशिनाथ सामंत, वय वर्षे ८७ आणि अविवाहित. त्याचे नव्वदीकडे झुकू लागलेले वय आणि गेले वर्षभर अशक्तपणामुळे त्याला जाणवत असणारा थकवा, त्यात माझा मामेभाऊ दादा नमसकर आणि त्याची सौभाग्यवती सौ. रतन त्याची करत असलेली अविरत सेवा, यामुळे ही बातमी मी तशी गृहीतच धरली होती; पण दुःखद बातमी ज्या वेळी सत्यरूप घेऊन येते त्या वेळी भावनांचे काहूर मनात दाटून येते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या परुळे गावातील नमसवाडी हे माझे आजोळ. अलीकडे एकविसाव्या शतकात जन्मलेल्यांना आजोळ समजणे कठीण! आम्हा १७ मावसभावंडांचे नमस हे केवळ आजोळ नसून दुसरे गोकुळच होते. थोरला तातामामा, मधला भाईमामा आणि धाकटा भाऊमामा! आमचा तातामामा तर जगन्मित्र आणि सामाजिक कार्यकर्ता. त्यामुळे त्याचा दबदबा जसा परुळे गावात, तसा सगळ्या कुटुंबातही! त्याचा दरारा आम्हा सर्वांना हवाहवासा वाटायचा आणि आम्ही तो दरारा यथेच्छ आनंदाने उपभोगायचो. आपल्या प्रौढत्वीही तातामामाने निजशैशवास छान जपून ठेवलेले होते. त्यांच्याविषयी मी यापूर्वीच एका लेखात पांढऱ्यावर काळे केलेले आहे. आमचा मधला मामा आणि त्यांचे कुटुंबीय सर्व मुंबई-बोरीवली मुक्कामी. त्यांची भेट कधी कधी योगायोगाने मे महिन्यात व्हायची. त्यांचे वास्तव्य मुंबईचे, त्यात टेक्स्टाइल पार्टचा व्यापार, त्यामुळे भाईमामाचे व्यक्तिमत्त्ल बहुश्रुत आणि आगळेवेगळे. एका भेटीत मागील सर्व प्रेमाची उणीव तो भरून काढायचा. सर्वांवर सारखीच माया करायचा.
नमस मुक्कामी आमच्या आजोळचा फेर आमचा तातामामा, आमची मामी, माईआजी (जी चुलतआजी आम्हाला वाटली नाही) आणि भाऊमामा यांच्यासमवेत असायचा. तातामामा आणि भाऊमामा दोघेही आमचे मामाच. सख्खे-चुलत भाऊ. दोघेही आयुष्यभर नमशीला एकत्र राहिले; पण मला ह्या गोष्टीचे आश्चर्य वाटते. माझा भाऊमामा आणि माझा तातामामा एकत्र येऊन एखाद्या विषयावर चर्चा किंवा खळखळून बोलले असतील, गप्पा मारल्या असतील हे मीच काय माझ्या १७ मावसभावंडांनी आणि सात मामेभावंडांनी कधी पाहिलेले नसेल. दोघांचे स्वभाव दोन टोकांचे. भाऊमामाचा स्वभाव थोडासा विक्षिप्त आणि एककल्ली. जुन्या आचार-विचारांशी जुळणारा, तर तातामामा ‘सब घोडे बारा टक्के’वाला! आज आम्ही सर्व १७ मावसभावंडे आणि सात मामेभावंडे सर्व ज्येष्ठ नागरिक या पदोन्नतीवर पोहोचलो असलो, तरी ते कोडे कोणालाच अजून सुटू शकले नाही.
माझे आजोळचे आजोबा कै. विष्णू सिताराम सामंत यांची मुंबईला पेढी होती, तीदेखील रसिकलाल नावाच्या एका गुजराती व्यापाऱ्यासमवेत. ‘रसिकलाल विष्णू’ या दोघांच्या संयुक्त नावाने त्या पेढीचा कारभार चालायचा. आमच्या भाऊमामाचे वडील आणि माझे चुलत आजोबा कै. काशिनाथ सीताराम सामंत आजोबांसमवेत असायचे. कै. काशिनाथ सामंत यांच्या अकाली निधनाने आजोबांच्या व्यापाराला उतरती कळा लागली. त्या काशिनाथ आजोबांना दोन मुले. त्यापैकी एक आमचे भाऊमामा (सदानंद) आणि मुलगी (कै. सौ. विमल). माईआजी ही भाऊमामा, विमल मावशी यांची आई. दुदैवाने तिला तरुणपणीच वैधव्य आले. तरी तिने आपली सारी हयात नमसकर-सामंत कुटुंबासाठी खर्च केली. आपल्या मुलांवर जसे तिचे प्रेम, तसेच सर्व कुटुंबावर! स्वतःच्या मुलावर जेवढे प्रेम किंबहुना काकणभर जास्त आमच्या तातामामावर! माझ्या सख्ख्या आजी-आजोबांना मी काही पाहू शकलो नाही; पण ते प्रेम, ती माया आणि ती आपुलकी आमच्या माईआजीने आम्हा सर्वांना दिली. त्याला आमच्या प्रेमळ मातृहृदयी मामीने साथ दिली. त्यामुळे बालपणीचे आमचे आजोळचे दिवस मंतरलेले गेले! आमची सत्तरी आली तरीही तो आजोळचा कृष्णधवल चित्रपट डोळ्यांसमोर जशाचा तसा उभा आहे.
तशी आजोळची शेती-बागायती फारच मोठी. भाऊमामाकडे त्याची आर्थिक जबाबदारी, तर तातामामाकडे त्याचे पूर्वनियोजन. असा चौदा चौकड्यांच्या मोठ्या कुटुंबाचा कारभार एकमेकांसोबत ‘शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ असा कसा चालायचा? याचेच लहानपणी कुतूहल वाटायचे. तातामामाला कोर्ट-कचेरी, कज्जेदलाली यासाठी भाऊमामा पैसे द्यायचा. तातामामा वेंगुर्ले-कुडाळ-मालवण हा सगळा फेरफटका मारून आल्यावर एका पाटीवर हिशोब करून ती पाटी भाऊमामाकडे मागील दारी पाठवायचा. कित्येक वेळा ह्या पाट्या पोहोचविण्याची जबाबदारी मे महिन्यात माझ्याकडे असे.
हळूहळू आम्हीही मोठे झालो. ती जबाबदारीही संपली. नमशीचा कारभार तसाच चालू होता. सख्खा मामा कोण आणि चुलतमामा कोण, हे आम्हाला मोठे झालो तरी समजत नव्हते. तातामामा बोलून ओरडून सर्व सांगायचा, तर भाऊमामा न सांगताच सर्व करायचा. भाऊमामाचे प्रेम आपल्या सख्ख्या बहिणीपेक्षा (कै. विमल मावशी) ताई, बाई, लीला आणि बाया (माझी आई) ह्या चुलत बहिणीवर जास्त. ह्या चुलत बहिणींची माया आपल्या सख्ख्या तातामामा, रमामामा यांच्यापेक्षाही भाऊमामावर अधिक. तातामामाने तर आपल्या बहिणीएवढेच प्रेम आपल्या छोट्या चुलत बहिणीवर केले. श्रीमती विमल मावशी मे महिन्यात मुंबईवरून वालावलला आली, की आमचा तातामामा मला घेऊन तिच्याकडे जायचा; पण आमचा सदामामा कधी सख्खी बहीण असून विमल मावशीकडे गेलेला माझ्या पाहण्यात नाही. त्यांचे जास्त प्रेम माझ्या छोट्या मावशीवर सौ. लीला मावशीवर! आणि सगळ्या चुलत बहिणींवर. अशा आगळ्या रंगात आणि आगळ्या ढंगात आमचे बालपण गेले.
आजोळी गेल्यावर आजोळच्या पुढील बाजूला तातामामासोबत छान-मॅन करून (हा तातामामाचा खास शब्द) अगदी मनसोक्त गप्पांचा फड आटोपून आम्ही मागील दारी जायचो. भाऊमामा कायम मागील दारी, त्यांची बैठकीची तीच जागा आणि रात्रौ झोपण्याचा लाकडी पलंग. सोबत पानाचा डबा. भाऊमामाच्या गप्पांचा फड वेगळा. बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते यांच्या हृद्य आठवणी. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे कौतुक! मालवणच्या सेवांगण संस्थेची आपुलकीने चौकशी. त्यानंतर त्याच्या जिव्हाळ्याच्या मालवणच्या बाबूकाका अवसरेच्या कार्याचे कौतुक! श्रीमती दुर्गा मावशी (नाईक) हिची ख्याली-खुशाली. भ्रष्टाचारी सरकारवरती खडसून टीका. अशा आमच्या गप्पा राजकारण समाजकारणावर रंगत. आम्हाला पुढील बाजूला तातामामासोबत वरच्या पट्टीतला ‘सा’ लावावा लागायचा, तर भाऊमामासोबत खालच्या पट्टीतील ‘सा’ सांभाळत बोलणे व्हायचे. त्याचे जे मत तेच आपले मत. असे समजूनच त्याच्यासोबत बोलायचे असेच मी ठरविले होते.
आमच्या भाऊमामाचा दिनक्रम त्यानेच स्वतःभोवती आखून घेतलेल्या एका विशिष्ट चौकटीत चालायचा. माझ्या आजोबांनी त्या काळी त्याला मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी ठेवले होते. मामा मॅट्रिकही झाला; पण त्याकाळी नोकरीसाठी मामा बाहेर का गेला नाही, त्याचे कारणही समजले नाही. नमस येथील बानाचीवाडी, कर्ली, शिरडी, जोळका येथील आपली बागायती- शेती आपलीच मानून दोघेही मामा एकत्र ढोरकष्ट उपसू लागले. काळ्या कातळावर आणि खाऱ्या जमिनीत घाम गाळू लागले.
दर पंधरवड्याला नारळ विक्रीसाठी कुडाळ आणि दर आठवड्याला घरगुती बाजारासाठी परुळेबाजार हीच भाऊमामाची एकमेव करमणूक होती! परुळ्याचा आठवडाबाजार तो कधी चुकवायचा नाही. सर्व आठवड्याची घरगुती खरेदी आणि परुळे पंचक्रोशीची जेवढी माहिती मिळेल, तेवढी घेऊन दुपारच्या एसटीने मामा नमशीत यायचा. गेली दहा वर्षे त्याने कुडाळ बाजार बंद केला होता. आता तो सर्व व्यापार माझा मामेभाऊ दादा नमसकर सांभाळतो. परुळे बाजाराला जाणे हा भाऊमामाचा विरंगुळा असायचा. मे महिन्यात कधी कधी मीदेखील त्याच्यासोबत परुळे बाजारात जायचो. परुळे बाजारात प्रमोद शिरसाटांच्या दुकानात खरेदी झाल्यावर परुळ्याच्या दुतोंड, शेळपी, तेरावळे, नेवाळी आदी भागांतून आलेल्या शेतकरी मित्रांबरोबर त्याच्या गप्पा रंगायच्या. त्यात दिगंबर दुतोंडकर, संजय सामंत, आबा नेरकर, भाऊ सामंत यांच्यासोबत जरा जास्तच गप्पा रंगायच्या! डॉ. उमाकांत सामंत, अॅड. अभय देसाई, श्री. अविनाश देसाई ही त्याची ठेवणीतली माणसे! अॅड. अभय देसाईंच्या आकस्मिक जाण्याने भाऊमामा फारच भावूक झाला होता.
आम्ही मोठे झालो तरी नमशीची वार्षिक तीर्थयात्रा चुकायची नाही. मागील बाजूला भाऊमामासोबत गप्पा तशाच रंगायच्या. त्यांच्याशी गप्पांचा फड जमविणे थोडे मोठे झाल्यावर कसब वाटत असे. त्याचे विषय पारंपरिक असत. उदा. ‘कालनिर्णय’कार कै. जयवंतराव साळगावकर यांचे मालवणचे बालपण, सर्वश्री वामन मंत्री ते जयराम झांट्ये यांचे जुन्या काळातील व्यापारउदीम, मालवणचे सामाजिक कार्यकर्ते कै. मधू वालावलकरांचे समाजकारण ते कै. दाजी अवसरेंचे निर्धोक ड्रायव्हिंग आदी विषयावर गप्पा रंगायच्या. ती सारी त्याची श्रद्धास्थाने होती. त्या श्रद्धास्थानांना धक्का लावलेला भाऊमामाला आवडत नसे. आपल्या सर्व बहिणी हा त्यांचा परिवार. हेच आमच्या भाऊमामाचे ‘वसुधैव कुटुंब’ होते. आमचा आजोळी सहवास त्याला हवाहवासा वाटायचा. त्याचे प्रेम कधी ओठांतून प्रकट झालेच नाही. ते सारे पोटात असायचे. म्हणूनच त्याचे अंतःकरण कधी कोणाला कळलेच नाही.
निसर्गनियमाप्रमाणे आजोळच्या वटवृक्षाचे एक-एक पान गळून गेले. ३० वर्षांपूर्वी नमशीच्या कुटुंबाचा धारण असलेली माईआजी गेली, १२ वर्षांपूर्वी आजोळचा आनंदयात्री तातामामा गेला, दोन्ही प्रेमळ माम्या निवर्तल्या! माझ्या आईसहित सर्व मावश्या देवाघरी गेल्या. भाईमामा (रमामामा) आणि भाऊमामा (सदामामा) ह्याच दोन वाती आजोळच्या नंदादीपात मिणमिणत होत्या. सहा वर्षांपूर्वी आमच्या आजोळच्या घराचे नूतनीकरण झाले. भाईमामा (रमाकांत सामंत) मुंबईहून आले होते. मावसभावंडे, मामेभावंडे यांच्या पुढच्या पिढ्याही हजर होत्या. नमशीला आजोळचे भरतेच आले होते. सर्वांच्या गळाभेटी झाल्या.
सकाळी धार्मिक विधी झाल्यावर संध्याकाळी आजोळचे स्नेहसंमेलन भरविण्याचा विचार माझ्या मनात आला. दोन्ही मामांचे सत्कार आणि प्रकट मुलाखत घ्यायचा प्रस्ताव मी मांडला. सर्व जण तयार झाले. प्रश्न होता तो भाऊमामाचा. असल्या समारंभात त्याला रस नसायचा. मी त्याला आग्रह केला. त्याने त्या आग्रहाला मनापासून होकार दिला. दोन्ही मामांच्या नेतृत्वाखाली (भाईमामा आणि भाऊमामा) स्नेहसंमेलन अपेक्षेपेक्षा रंगतदार झाले. दोन्ही मामांची मी प्रकट मुलाखत घेतली. भूतकाळातील आठवणींना उजाळा मिळाला. त्या मुलाखतीत काय आश्चर्य! भाऊमामाची कळी एकदम खुलली! त्याने पूर्वीच्या सर्व आठवणी जागविल्या! सोहळा अपूर्व जाहला!

चार वर्षांपूर्वी १० ऑक्टोबर २०१९ ला आमचे भाईमामा (रमाकांत विष्णू सामंत) देवाघरी गेले. बोरीवली आणि नमस यांच्यामधला मायेचा दुवा निखळला. नमशीची शेवटची ‘पाती’ भाऊमामाच होता. आमचे आजोळ त्यांच्या सभोवतीच होते. त्यांच्या सर्व विक्षिप्तपणाला विसरून माझा मामेभाऊ आणि वहिनी रतन न बोलता त्यांची सेवा करत होती.
गेल्या श्रावण महिन्यात आजोळच्या तीर्थस्थानाला भेट घडली होती; पण या वर्षी माझ्या आजारपणामुळे आणि हृदय शस्त्रक्रियेमुळे नमशीला जाणे झाले नाही. भाऊमामाची ती भेट अखेरची ठरली. त्याच वेळी भाऊमामाच्या डोळ्यांत मला आजोळची चतुर्थी दिसत होती. आजोळच्या गणपतीला सर्वांनी यावे, सोवळे नेसून अथर्वशीर्षाच्या एकादष्ण्या गणपतीला करायच्या, हा त्याच्या आनंदाचा आग्रहाचा क्षण! फुलांपासून दूर्वांपर्यंत सर्व पूर्वनियोजन तो करायचा. या वर्षीची गणेश चतुर्थी दोन आठवड्यांनी येईल. आजोळच्या गणपतीला सामूहिक एकादष्ण्या घडतीलही; पण भाऊमामाचा देवघरातील रिकामा पाट सर्वांचे डोळे भिजवून टाकणार. कारण ‘मावळेवसाची शेवटची पाती’ दूरच्या प्रवासाला निघून गेली.
‘भाऊमामा गेले’ हे सांगायला मोठ्या बहिणीचा कुडाळवरून फोन आला, त्या वेळी मनात जे विचार आले ते आज शब्दांत उमटले. आज (एक सप्टेंबर २०२३) कै. भाऊमामाचा बारावा दिवस. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना नमस गोकुळवासीयांच्या वतीने करतो आणि थांबतो.
- सुरेश श्यामराव ठाकूर
पत्ता : १२८, आचरे-पारवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६१४
मोबाइल : ९४२१२ ६३६६५
ई-मेल : surshyam22@gmail.com
(ललित लेखक, स्तंभलेखक; कार्योपाध्यक्ष, बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण; कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष; अ. भा. साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष)
…….
(सुरेश ठाकूर यांनी लिहिलेले अन्य लेख वाचण्यासाठी खालील शीर्षकांवर क्लिक करा.)
- मालवणचे मामा : नाट्यकार भार्गवराम विठ्ठल वरेरकर
- बॅ. नाथ पै : ओजस्वी वक्तृत्वाचे तेजस्वी दर्शन
- सिंधुभूमीतील महामहोपाध्याय : डॉ. वा. वि. मिराशी
- आचरे गावातली रामनवमी… ‘पुलं’, कुमार गंधर्वांच्या सहभागाने पुलकित झालेली…

