रत्नागिरी : येथील जनसेवा ग्रंथालयाचा यावर्षीचा ‘उत्कृष्ट वाचक पुरस्कार’ ग्रंथालयाचे वाचक-सभासद सुभाष दत्तात्रय भडभडे यांना जाहीर झाला आहे.
वाचन संस्कृती वाढीस लागावी, या हेतूने जनसेवा ग्रंथालय दरवर्षी विविध उपक्रम राबवत असते. याच हेतूने गतवर्षीपासून रत्नागिरीच्या ज्येष्ठ लेखिका स्व. स्मिताताई राजवाडे यांच्या संकल्पनेतून ‘उत्कृष्ट वाचक पुरस्कार’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ग्रंथालयाच्या सभासदांना हा पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी पुरस्कार निवड समिती काम करते. श्री. भडभडे यांचे वाचन चळवळीतील कार्य पाहून त्यांना यावर्षीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सुभाष दत्तात्रय भडभडे निवृत्त शिक्षक असून दररोजच्या वृत्तपत्रीय वाचनाबरोबरच अध्यात्म, ललित, कथा, सिनेमा आदींबाबत त्यांनी विपुल ग्रंथ, साहित्य वाचन केले आहे. ग्रंथालयाचे सभासद असलेले भडभडे यांना वाचता वाचता लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यातूनच त्यांचे ललित लेखांचे ‘अंतरंग’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून त्याला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. त्यांच्या पत्रलेखनाच्या छंदामुळे आज त्यांच्याकडे अनेक नामवंत व्यक्ती, राजकारणी, साहित्यिक यांच्या हस्ताक्षरातील दुर्मिळ पत्रलेखनाचा ठेवा त्यांनी जपला आहे. जनसेवा ग्रंथालयाच्या सर्वच उपक्रमात ते सातत्याने सक्रिय असतात, आणि वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यात कार्यरत असतात. त्यांचे हे वाचन चळवळीतील योगदान लक्षात घेऊन त्यांना यावर्षीचा उत्कृष्ट वाचक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती जनसेवा ग्रंथालयातर्फे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी दिली.
येत्या शनिवारी, दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता जनसेवा ग्रंथालयात या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

