पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या प्रचारासाठी सायकल फेरी

रत्नागिरी : पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा, असा प्रचार करण्यासाठी तसेच स्वच्छ, सुंदर हरित रत्नागिरी’चा संदेश घेऊन जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आज सायकल फेरी काढून जनजागृती केली.

पोलीस संचलन मैदानावर हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या सायकल फेरीचा शुभांरभ केला. यावेळी परिवीक्षाधीन आयएस अधिकारी डॉ. जस्मिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, विशेष भूसंपादन अधिकारी निशाताई कांबळे, रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबचे दर्शन जाधव, महेश सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशमूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, गणेशोत्सवाची जिल्ह्याची आगळीवेगळी ओळख आहे. जिल्ह्यात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. हरित रत्नागिरी, स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी हे तीन उद्देश घेऊन आणि पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करावा. याबाबतची जनजागृती व्हावी, यासाठी तीस किलोमीटरची सायकल फेरी आयोजित करण्यात आली अहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आवाहनासोबतच अधिकारी, कर्मचारी यांनी आपले आरोग्य, स्वास्थ्य चांगले ठेवण्याचा संदेशही या सायकल फेरीतून माध्यमातून देण्यात आल्याचे ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, कोकणामध्ये गणेशोत्सव दिमाखात साजरा केला जातो. अधिक पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबतची जनजागृती करण्यासाठी फेरीचे आयोजन करण्यात आले. सायकल चालविणे हा पर्यावरणपूरक असा उपक्रम असल्याने सायकल फेरीच्या माध्यमातून जनतेला या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याचा संदेश देऊ या.

फेरी मारुती मंदिर-गोडाऊन स्टॉप-आरटीओ ऑफीस-कुवारबाव-रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणेमार्गे परत कुवारबाव-मारुती मंदिर-जयस्तंभ-रामआळी-गाडीतळ-टिळक आळी-काँग्रेस भुवन-आठवडा बाजारातून पोलीस संचलन मैदानावर आली. तेथे फेरीची सांगता झाली.

पर्यावरणपूरक मातीच्या, कागदी मूर्तींचा वापर, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर, सजावटीसाठी प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर न करता कागद, कापडी पडद्यांचा वापर तसेच डॉल्बी टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर याबाबत या फेरीतून संदेश देण्यात आला. मैदानावर सेल्फी पॉइंटही उभारण्यात आला होता. तसेच मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्धार मतदानाचा – मी मतदान करणारच.. !’ यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

या फेरीमध्ये अधिकारी, कर्मचारी, सायक्लिस्ट, नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply