पुणे : शिक्षणाचा ध्यास घेणाऱ्या युवा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे शिक्षण माझा वसा या राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षणाचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा, आवड निर्माण करण्यासाठी शिक्षक सातत्याने कार्यरत असतात. आपल्याकडील माहितीला अनुभवाची जोड देत वैविध्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करणारे शिक्षक नेहमीच कौतुकास पात्र ठरतात. अशा युवा शिक्षकांसाठी ‘शिक्षणविवेक’ आणि ‘टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या जानेवारीमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील केवळ स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद शाळा, खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांची ज्ञानरचनावादावर आधारित नावीन्यपूर्ण उपक्रमांची नामांकने मागविण्यात आली आहेत. त्यामध्ये ५ अध्यापन विषय (१. भाषा मराठी / हिंदी / इंग्रजी, २. गणित, ३. विज्ञान, ४. कला चित्र / नाट्य / शिल्प / संगीत, ५. तंत्रज्ञान), एक उपक्रमशील मुख्याध्यापक आणि एक विशेष पुरस्कार अशा सात पुरस्कारार्थींची निवड केली जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि ५,००० रुपये असे आहे.
नामांकनासाठी नियम आणि निकष असे : नामांकन पाठवणाऱ्या शिक्षकाचे कमाल वय ४५ वर्षे असावे. (दि. १ डिसेंबर, २०२३ पर्यंत). जन्मदाखला पुरावा आवश्यक आहे. (उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कारासाठी वयाची अट नाही.) खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांसाठी शाळा अनुदानप्राप्त असल्याचा दाखला आवश्यक आहे.
अर्ज करणाऱ्या शिक्षकांनी सध्या कार्यरत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहीचे पत्र गुगल फॉर्ममध्ये जोडावे. उपक्रमशील मुख्याध्यापक या नामांकनांसाठी शाळा समिती अध्यक्षांच्या सहीचे पत्र जोडावे. पत्रामध्ये शिक्षक / मुख्याध्यापकाच्या नावाचा उल्लेख असणे आवश्यक आहे.
किमान ३ वर्षे एका उपक्रमाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली असावी. कला शिक्षकांसाठी शासन नियुक्ती अनिवार्य आहे. नामांकन पाठवण्याची अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०२३ ही आहे.
नामांकन पाठविताना उपक्रमाची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे पाठवावी. शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव, पत्ता, उपक्रमाचे नाव, उपक्रमाची गरज, उपक्रमाची कार्यपद्धती आणि अंमलबजावणी, उपक्रमात आलेल्या अडचणींवर केलेल्या उपाययोजना, निष्कर्ष, पुढील नियोजन, उपक्रमासंबंधीची छायाचित्रे.
ही माहिती शिक्षणविवेक, म. ए. सो. भवन, १२१४-१२१५, सदाशिव पेठ, पुणे ३० या पत्त्यावर कुरिअरद्वारे पाठवावी किंवा mazavasa2024@gmail.com या मेल आयडीवर पाठवावी. ही सर्व माहिती ऑनलाइन भरण्यासाठी https://forms.gle/DEDHPevEgQNdlyDehttps://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeyyWPecQP2hbfMHU1e-48TOrLw2JW3rs7l67oNdIZd_R8xrg/viewform7 या गुगल लिंकचा वापर करावा. फॉर्म भरल्यानंतर ९९२२५७७७४ किंवा ८४२१९९८६३२ या संपर्क क्रमांकावर मेसेज करावा. अधिकाधिक शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

