रत्नागिरी : येत्या ७ जानेवारीला रत्नागिरीत होणाऱ्या कोकण कोस्टल मॅरेथॉनचे उद्घाटन रत्नागिरीतील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या हस्ते होणार आहे.
सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित या मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण तथा भैय्या सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. रत्नागिरीतील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू ऐश्वर्या सावंत, अपेक्षा सुतार, संपदा धोपटकर, आरती कांबळे आणि वीरमाता श्रीमती ज्योती राणे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. ज्या खेळाडूंनी रत्नागिरीचा झेंडा देशात व राज्यात फडकवला, त्या महिला खेळाडूंना फ्लॅग ऑफचा मान देण्याची आगळीवेगळी कल्पना सत्यात उतरणार आहे.. येत्या ७ जानेवारीला सकाळी ६ वाजता थिबा पॅलेस रोडवरील मथुरा हॉटेल येथून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
स्पर्धेत देशभरातून सुमारे १५०० धावपटूंनी नोंदणी केली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी एवढी मोठी संख्या असणे आव्हानात्मक होते. परंतु हे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. स्पर्धेतील २१ किमीसाठी ३५० पेक्षा अधिक, १० किमीसाठी ४५० पेक्षा जास्त आणि ५ किमीसाठी सर्वाधिक म्हणजे ५५० हून अधिक धावदूतांनी नोंदणी केली आहे. यापैकी ३५ टक्के खेळाडू रत्नागिरीबाहेरील आहेत. स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासन पर्यटन महासंचालनालय, बॅंक ऑफ इंडिया, रत्नागिरी हॉटेल असोसिएशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, ब्रूक्स, एमआर असोशिएशन आदींचे सहकार्य लाभले आहे.
ज्या भागातून ही स्पर्धा होणार आहे त्या मार्गावर धावपटूंना रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून प्रोत्साहन देता येईल. धावपटूंच्या स्वागतासाठी ढोल-ताशे वाजविता येतील. हातात बॅनर, बोर्ड घेऊन रत्नागिरीत पर्यटनस्थळांचे किती छान आहेत, त्याचे फोटो प्रदर्शित करता येतील. आपापल्या कंपनीचे, संघटनेचे, संस्थेचे, मंडळाचे, ग्रुपचे नावाचे बोर्ड घेऊनन उभे राहता येईल. तसेच सकाळी ७.३० वाजल्यापासून भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर सहभागी स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी जरूर यावे, असे आवाहन सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांनी केले आहे.
स्पर्धेचे मार्ग असे – २१ किमीचा मार्ग- वेळ सकाळी ६.०० वाजता, हॉटेल मथुरासमोरून सुरवात, माळ नाका, मारुती मंदिर, नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, चिंचखरी, वेसुर्ले, नवा फणसोप, भाट्ये गाव ते भाट्ये समुद्र किनारा. १० किमीचा मार्ग – सकाळी ६.१५ वाजता, हॉटेल मथुरासमोरून सुरवात, माळ नाका, मारुती मंदिर, नाचणे, शांतीनगर येथून फिरून परत मारुती मंदिर, गोगटे कॉलेज, भाट्ये समुद्रकिनारा. ५ किमीचा मार्ग – सकाळी ६.५० वाजता मथुरासमोरून सुरवात, माळ नाका, मारुती मंदिर, नाचणे पॉवरहाऊस येथून फिरून परत मारुती मंदिर, गोगटे कॉलेज, भाट्ये समुद्र किनारा. स्पर्धेचे बक्षीस वितरण भाट्ये समुद्रकिनारी होणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

