छोट्या शहरांमध्ये साहित्य संमेलनांची गरज – विनोद शिरसाठ

राजापूर : समाजाची जडण-घडण आणि प्रबोधनासाठी तालुका स्तर, ग्रामीण भागामध्ये अशा संमेलनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले.

ओणी (ता. राजापूर) येथे कोकण मराठी साहित्य परिषदेची राजापूर शाखा, ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, सर्वोत्कर्ष सामाजिक संस्था, सुप्रभा सहकारी पतसंस्था आणि सुप्रभा वाचनालय (कोंडिवळे) यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कोकण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या समारोप समारंभाला श्री. शिरसाठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. शिरसाठ पुढे म्हणाले की, साहित्य संमेलने, परिसंवादांचे मोठ्या शहरांमध्ये आयोजन करण्याची आता गरज राहिलेली नाही. ओणीतील कोकण मराठी साहित्य संमेलनासाठी झालेल्या गुंतवणुकीचा आगामी काळामध्ये निश्‍चितच परतावा होणार आहे. मराठी भाषेची लिखित परांपरा सुमारे दोनशे वर्षांची असून तिच्यातील ज्ञानाच्या संचिताची गणना करता येणार नाही. असे माइलस्टोन ठरणारे विपुल मराठी साहित्य सोडून मराठी भाषिक पालकांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे शिक्षण घेण्यासाठी वळत असल्याबाबत चिंता त्यांनी व्यक्त केली.

लेखकाच्या लेखनामागे निव्वळ अहंभाव, कलाविषयक आसक्ती, इतिहासाविषयी उमाळा आणि राजकीय हेतू ही कारणे असतात. मात्र सामाजिक बदल वा परिवर्तनाचा आग्रह करणारे लेखन नसेल, तर ते निरुपयोगी ठरते. साहित्य वा संबंधित घटकांनी समाजव्यवस्थेला प्रश्‍न विचारले नाहीत, तर असा समाज रसातळाला जातो. त्यामुळे साहित्याने समाजव्यवस्थेला प्रश्‍न विचारणे गरजेचे आहे. कठीण प्रसंगात व्यक्त होणे ही मोठी कृती असते. ती बजावली नाही, तर आपण कर्तव्यापासून दूर गेलेलो असतो, असेही श्री. शिरसाठ म्हणाले.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड. वासुदेव तुळसणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर ओणी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शहाजीराव खानविलकर, प्रसिद्ध समीक्षक देवानंद सोनटक्के, मुख्याध्यापक तानाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. खानविलकर यांनी आणीबाणीच्या काळातील साधना साप्ताहिकाच्या योगदानाच्या आठवणींना उजाळा देताना समाजाच्या जडणघडणीमध्ये प्रसारमाध्यम म्हणून बजावलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. अ‍ॅड. तुळसणकर यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे व्रत भविष्यात कायम ठेवण्याचे आश्‍वासित केले. आभार श्री. शिंदे यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. विनोद मिरगुले यांनी केले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply