मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघ आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
येत्या २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा गौरव दिन मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने ‘माझ्या मायबोलीचे मराठी साहित्यातील स्थान’ या विषयावरील १२०० शब्दमर्यादा असलेली ही स्प्रधा आयोजित केल्याची माहिती संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी दिली. यावेळी ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.
यानिमित्ताने दिवंगत कामगार नेते वसंतराव होशिंग यांच्या स्मरणार्थ मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्र लेखक, निवृत्त व सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक, शिक्षक, साहित्यिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, मराठी भाषाप्रेमी यांच्यासाठी विनामूल्य लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कोसकोसावर बदलणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक बोलीभाषांनी आपली मराठी भाषा समृद्ध झाली आहे. खेड्यापाड्यातील मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते, कशीही असो ती ‘मराठी’ म्हणूनच मराठी माणसाला आवडते. बोलीभाषेतील साहित्यकृतींचा धांडोळा घेत स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी लेख लिहावा, अशी अपेक्षा आहे.
पहिल्या ५ जणांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व इतरांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. स्पर्धेचे लेख युनिकोड फॉंटमध्ये टाइप करून १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत chalval1949@gmail.com या ईमेलवर पाठवावेत. तसेच स्पर्धेची अधिक माहिती, नियमावली व आगाऊ नोंदणी करण्यासाठी स्पर्धा समन्वयक राजन देसाई (८७७९९८३३९०) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त अॅड. देवदत्त लाड, विकास होशिंग, संजीव गुप्ते यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

