मार्लेश्वर-गिरीजादेवीचा विवाहसोहळा थाटामाटात

देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील स्वयंभू मार्लेश्वर तीर्थक्षेत्री चि. मार्लेश्वर आणि चि. सौ. कां. गिरीजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) आज दुपारी १ वाजण्याच्या मुहूर्तावर हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला.

साक्षात परमेश्वराचा विवाहसोहळा डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी हजारो भाविकांनी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री मोठी गर्दी होती. विवाहसोहळा होताच उपस्थित भाविकांनी हर हर मार्लेश्वरचा जयघोष करत सह्याद्रीच्या पर्वतरांगा दणाणून सोडल्या. आज सोमवार असल्याने एक वेगळा योग साधला गेल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह होता.

मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव गेल्या १२ जानेवारीला सुरू झाला असून तो जानेवारीपर्यंत चालणार आहे. पहिल्या दिवशी प्रथेप्रमाणे आंगवली मठात मार्लेश्वर देवाचा मांडव घालून यात्रोत्सवाची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी रात्री आंगवली मठात मार्लेश्वर देवाला हळद लावण्यात आली आणि घाणा भरण्यात आला. काल सायंकाळी कल्याणपूर्व विधी पार पडले आणि रात्री १२ वाजता मठातून यात्रा, दिंड्या निघाल्या. कावड, पालख्या बाहेर पडल्या. मार्लेश्वराच्या पालखीचे शिखराकडे प्रस्थान झाले.

त्याच दरम्यान देवरूखच्या व्याडेश्वराची पालखी, आंबव आणि लांजा येथील दिंड्या तर वांझोळे येथील कावड या सर्वांनी पवईला जाण्यासाठी प्रयाण केले. पवईतून मार्लेश्वराची पालखी, यजमान व्याडेश्वराची पालखी, दिंड्या आणि कावड या सर्वांनी शिखराकडे प्रस्थान केले. तत्पूर्वी साखरप्याच्या गिरीजादेवीची पालखी शिखरावर पोहोचली होती. सर्वजण शिखरावर पोहोचल्यानंतर सोमवारी सकाळी मुलगी पाहणे, मुलाचे घर पाहणे, मागणी घालणे, पसंती करणे, मानपान असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानंतर मार्लेश्वर-गिरीजादेवीच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला. विवाहसोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वी रायपाटणकर स्वामी व लांजेकर स्वामी यांना मंदिराजवळ आणण्यात आले. त्यांची पाद्यपूजा झाल्यावर त्रिपूर उजळण्यात आला. यानंतर तब्बल ३६० मानकऱ्यांना विवाहाचे अगत्यपूर्वक निमंत्रण देण्यात आले.

यानंतर लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करून विवाहसोहळ्याला मंत्रघोषात प्रारंभ झाला. दुपारी १ वाजण्याच्या मुहूर्तावर मंगलाष्टकांनी विवाहसोहळा झाला. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी साक्षात परमेश्वराचा विवाहसोहळा आपल्या डोळ्यांत साठवून ठेवला. सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर एखाद्या लग्न मंडपाऐवजी सह्याद्रीच्या कडेकपारीत पर्वतरांगांमध्ये घुमत होते.

या विवाहसोहळ्याला तहसीलदार अमृता साबळे, चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्यासह राजकीय पक्षांचे नेते, बापू शेट्ये, मुरादपूरचे माजी सरपंच मंगेश बांडागळे आदी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply