Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

आर्थिक व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थिदशेतच घ्यावेत : डॉ. मकरंद साखळकर

Advertisements

रत्नागिरी : आर्थिक व्यवस्थापन हाच आर्थिक समृद्धीचा मार्ग असून विद्यार्थिदशेतच आर्थिक व्यवस्थापनाचे धडे गिरविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग आणि करियर कट्टा, नाबार्ड आणि कोकण विभागीय उच्च शिक्षण विभागीय सहसंचालक यांया संयुक्त विद्यमाने ‘वित्तीय साक्षरता’या एक दिवसीय कार्यशाळा महाविद्यालयात झाली. त्यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. साखळकर बोलत होते. ते म्हणाले, आर्थिक व्यवस्थापनाचे कौशल्य विद्यार्थिदशेत आत्मसात करणे खूप महत्त्वाचे आहे. योग्य वेळी केलेली बचत, योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक आयुष्यभर सुख आणि आर्थिक समृद्धी देत असते. ‘पैसा जपला तरच पैसा आपल्याला जपतो’ या उक्तीप्रमाणे विद्यार्थिदशेत पैशाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जग बदलत आहे, तसा आपला भारत देशही बदलत आहे. सध्या जगातल्या पाच मोठ्या अर्थव्यवस्थेत आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश होतो. पुढील २५ वर्षांत देश स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करेल तेव्हा विकसित देशांच्या यादीत आपल्या देशाचा समावेश करण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. देशाचे भविष्य सक्षम करावयाचे असेल तर आपली तरुणाई आर्थिकदृष्ट्या साक्षर असणे आवश्यक आहे. हे अर्थविषयक जाणीव जागृतीचे महत्त्वपूर्ण काम वित्तीय साक्षरतेच्या कार्यशाळेतून होईल.

‘अर्थ निर्मिती’ या विषयावर नाबार्ड नियुक्त मार्गदर्शक प्रशांत औटी यांनी वित्तीय साक्षरतेसंदर्भात मार्गदर्शन केले. शिक्षणाचा हेतू काय असावा, आपणास आर्थिक स्वातंत्र्य का मिळाले पाहिजे, याची जाणीव विद्यार्थांना करून दिली. आपण पैशामध्ये किंमत करतो पण पैशाची किंमत कशी करावयाची, हे आपल्याला कुणीही कधीच सांगत नाही. पैसे कमवायला किती धडपड करावी लागते, हे पैसा कमवायला लागल्याशिवाय आपणास उमजत नाही. विविध शासकीय योजनांच्या माध्यमांचे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. बँकांतील ठेवींमधील गुंतवणूक, विमा, शेअरबाजार, एसआयपी, म्युच्युअल फंड यासारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करून आर्थिक सुबकता प्राप्त करता येईल. गुंतवणूक करताना आपली आणि आपल्या कुटुंबाची फसवणूक होऊ नये याची जाणीव विद्यार्थांना व्हावी. वित्तीय बाजार, पैशाचे आणि वैयक्तिक वित्तीय गुंतवणुकीचे प्रभावी नियोजन कसे करावे, यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत अर्थशास्त्र विभागातील ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी पॅनकार्ड, डीमॅट खाते काढण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यशाळेचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रामा सरतापे यांनी केले. अर्थशास्त्र विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सूत्रसंचालन डॉ. दिनेश माश्रणकर यांनी केले, तर प्रा. सूर्यकांत माने यांनी आभार मानले.

कार्यशाळेच्या नियोजनासाठी विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, कला शाखा उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी यांचे सहकार्य लाभले.

कार्यशाळेत मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, सोबत प्रशांत औटी, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रामा सरतापे
Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version