रत्नागिरी : आधुनिक युगामध्ये जागतिक रोजगार निर्मितीसाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्य निर्माण करण्यासाठी ‘ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत एंटरप्रिन्युअर्स’ या संस्थेशी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने सामंजस्य करार केला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीसाठी ही संस्था तीन स्तरावरती काम करणार आहे. हुशार आणि होतकरू मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी ‘सुभद्राबाई शिक्षण निधी संस्था’ काम करणार आहे. तसेच उद्योजकता वाढीसाठी मोटिव्हेशनल लेक्चर्स, नवीन उद्योजक, विद्यार्थ्यांसाठी आर्थिक संधी कोणत्या प्रकारच्या आहेत, याविषयी संस्थेतर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर विक्री व्यवस्थेसाठी ‘ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत एंटरप्रिन्युअर्स’ ही संस्था सहकार्य करणार आहे.
या करारामुळे गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि रत्नागिरीतील स्थानिक युवकांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.
याप्रसंगी ‘ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत एंटरप्रिन्युअर्स’चे संस्थापक सीए सिद्धार्थ सिनकर आणि त्यांच्या पत्नी सौ. सीमा सिनकर उपस्थित होत्या. श्री. सिनकर यांचा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत व्यवसाय सुरू असतो. तसेच ते सामाजिक बांधिलकी म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. सामंजस्य करारप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सहकार्य करायचे मान्य केले आहे. यावेळी तिन्ही शाखांचे उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. सीमा कदम, डॉ. चित्रा गोस्वामी, IQAC समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, डॉ. यास्मिन आवटे, डॉ. विवेक भिडे, डॉ. रूपेश सावंत, डॉ. आनंद आंबेकर उपस्थित होते.
‘उद्योग आणि आर्थिक संधी केवळ महाविद्यालयाशी मर्यादित न राहता रत्नागिरी शहरातील उद्योजकांसाठीही त्यांचा उपयोग व्हावा’ अशी इच्छा प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि सीए श्री. सिनकर यांनी यावेळी व्यक्त केली.


