केवळ पैशांसाठी काम नको, त्यातून आनंदही मिळवा : दीपक गद्रे

रत्नागिरी : ‘वाणिज्य व्यवस्थापन म्हणजे सामूहिक काम अर्थात टीम वर्क आणि टीम मॅनेजमेंट आहे. योग्य प्रयत्न केले, तरच यश मिळते. केवळ पैसे हा दृष्टिकोन ठेवून काम करू नये. आपण करत असलेल्या कामातून आनंद मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी नीतिमत्ता बाळगणेही आवश्यक आहे, ही बाब युवा पिढीने ध्यानात ठेवावी,’ असे प्रतिपादन प्रथितयश उद्योजक दीपक गद्रे यांनी केले. रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतर्फे ‘पीएम-उषा’ उपक्रमांतर्गत ‘वाणिज्य आणि व्यवस्थापन, लेखाशास्त्र आणि वित्त आणि अर्थशास्त्र’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. आज (२९ नोव्हेंबर) झालेल्या या एकदिवसीय बहुविद्याशाखीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून गद्रे बोलत होते.

उद्घाटनप्रसंगी मंचावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अ‍ॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, निमंत्रक व प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सीमा कदम उपस्थित होत्या. या वेळी शिल्पा पटवर्धन म्हणाल्या, ‘पुढचे बघण्याची दृष्टी असलेला माणूस मोठा होतो. आपल्यात काय त्रुटी आहे, काय करू शकतो याचा विचार करा. तेव्हा कोकणी माणूस पुढे जातो. आतापर्यंत अशा चार परिषदा झाल्या, त्यामध्ये मुलांना काय नवीन कळले ते विचारा, म्हणजे त्यातून अनेक नवीन गोष्टी कळतील.’ उपकार्याध्यक्ष अ‍ॅड. साखळकर यांनीही या परिषदेला शुभेच्छा दिल्या. डॉ. साखळकर यांनी महाविद्यालयाची स्थापना, कोकणातील अग्रगण्य महाविद्यालय, नवीन शैक्षणिक धोरण व स्वायत्तता याविषयी विचार व्यक्त केले. परिषदेत मलेशियातील डॉ. अनबीया खैरील यांनी ऑनलाइन माध्यमातून आणि डॉ. केतन वीरा यांनी कार्यक्रमात बीजभाषण सादर केले. या परिषदेमध्ये विविध देश आणि भारताच्या विविध राज्यांमधले संशोधक, विद्वान, उद्योजक, व्यावसायिक, प्राध्यापक आणि विद्यार्थी असे मिळून ३५०हून अधिक जण सहभागी झाले होते. विविध विषयांवरच्या ८०हून अधिक शोधनिबंधांची पुस्तिका या वेळी प्रकाशित करण्यात आली. डॉ. रूपेश सावंतदेसाई यांनी माहिती दिल्यानंतर मान्यवरांनी पुस्तिकेचे प्रकाशन केले. डॉ. यास्मिन आवटे यांनी डॉ. गद्रे यांचा परिचय करून दिला. उपप्राचार्या डॉ. सीमा कदम यांनी मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची सुरुवात आणि प्रगतीचा आढावा घेतला. डॉ. मीनल खांडके यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply