रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे भगवान परशुराम व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात पार पडली.



दि. २१ ते २३ नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये व्याख्यानमाला पार पडली. पहिल्या दिवशी सायंकाळी ५ वाजता डोंबिवलीतील प्रसिद्ध वक्ते विशाल कवीश्वर यांचे ज्ञानेश्वरांचे पसायदान या विषयावर व्याख्यान झाले. पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरांनी विश्वशांतीसाठी केलेली प्रार्थना एवढेच आपल्याला माहीत आहे. पण कवीश्वर यांनी पसायदानाचा गर्भितार्थ सांगितला. याचना आणि प्रार्थना यातील फरक. आई, माता, माऊली यातील फरक. आनंद,गंधर्व, परमानंद, ब्रह्मानंद यांचा १०० पटीने गुणून प्राप्त होणारा पायरी पायरीने चढत जाणारा आनंद हे पदर त्यांनी छान उलगडून दाखवले.
दुसऱ्या दिवशी मुंबईतील प्रसिद्ध वक्ते सीए चंद्रशेखर वझे यांचे अपरिचित रामायण ‘ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी वाल्मीकी रामायणातील लोकांना माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या. श्री वाल्मीकी कोण होते, त्यांनी रामायण कशासाठी लिहिले, आपल्याला माहीत नसलेल्या कोणत्या गोष्टी रामायणात आहेत, श्री रामाचे प्रशासन कसे होते, रामराज्य का म्हणायचे, रामायणातून नेमके काय शिकायचे, इत्यादींबाबत त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
अखेरच्या दिवशी मुंबईचेच प्रसिद्ध वक्ते सतीश जोशी यांचे ”छत्रपती शिवाजी महाराज-द मॅनेजमेंट गुरू’ या विषयावर दृक्श्राव्य पद्धतीने व्याख्यान झाले. त्यांनी सीएसआर म्हणजे काय, महाराजांच्या वेळची शेतसारा पद्धती, तसेच एकेक किल्ला घेताना त्यांनी कशा प्रकारे डावपेच लढविले, त्यावेळचे अष्टप्रधान मंडळ, त्यातील प्रत्येकाची कामे कोणती होती, 1659 साली महाराजांना पकडण्यासाठी अफझलखान विजापूरवरून निघाल्यापासून त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी आणून त्याचा वध होईपर्यंत महाराजांनी कशाप्रकारे व्यूहरचना केली, याची विस्तृत माहिती त्यांनी दिली.
ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृह झालेली व्याख्यानमाला जाणकार श्रोत्यांच्या उपस्थितीत उत्साहात झाली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

