मराठी संत साहित्य संमेलनाला दहा लाखाचे अनुदान : उदय सामंत

रत्नागिरी : वारकरी साहित्य परिषद आयोजित अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनासाठी पुढची पाच वर्षे दहा लाख रुपये तसेच पुढील दहा वर्षे १५ लाख रुपये दिले जातील, अशी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.

बाराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे त्यांच्या हस्ते रत्नागिरीत उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. पुढील वर्षीदेखील रत्नागिरीतच संत साहित्य संमेलन घ्यावे, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली.

माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात हे संमेलन भरले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष हभप माधव महाराज शिवणीकर, वारकर साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील, हभप बापूसाहेब महाराज देहूकर, हभप मनोहर महाराज आवटी, राजेश ओसवाल, नीलेश महाराज, देवीदास महाराज, श्रीमंत शितोळे सरकार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने आज रत्नागिरीची भूमी पावन झाली आहे. रत्नागिरीकर आज रिंगण आणि पंढरी अनुभवणार आहेत. जातीय भेद नष्ट करणे, संत साहित्याची परंपरा पुढे सुरू ठेवणे, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम वारकऱ्यांकडून होत आहे. वारकरी संप्रदायाला राजाश्रय मिळाला पाहिजे. संप्रदायाच्या महंतांशी चर्चा करून लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल.

संमेलनाचे अध्यक्ष हभप माधव महाराज शिवणीकर म्हणाले, वारकरी संप्रदायाचा विचार ज्याने ज्याने घेतला तो जगात नावारूपाला आला. ते विचार जपले पाहिजेत, भक्त पुंडलिकाप्रमाणे आईबापांची सेवा मुलांनी केली पाहिजे. हा संस्कार अशा संमेलनातून देऊन निरोगी समाजमन बनण्यास उपयुक्त ठरेल.

ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. हभप पांडुरंग महाराज राशीनकर यांच्या हस्ते हभप माधव महाराज शिवणीकर यांच्याकडे वीणा प्रदान करण्यात आली. प्रास्ताविकात हभप विठ्ठल पाटील काकाजी यांनी आढावा सांगितला. शेवटी हभप चैतन्य महाराज कबीरबुवा यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने संमेलनाच्या उद्घाटन समारंभाची सांगता झाली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply