मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्ताने ‘मराठी भाषेची चिंता आणि चिंतन’ या विषयावर बोलीभाषेत कुसुमाग्रज तथा कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांना उद्देशून पत्रस्वरूपात राज्यस्तरीय लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ (मुंबई) आणि मनसे विभागध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या पार्थ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने येत्या २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे. दादर सार्वजनिक वाचनालयाच्या धुरू हॉलमध्ये हा समारंभ होईल. यावेळी ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.
यानिमित्ताने पार्थ फाउंडेशनच्या सहकार्याने मुंबईसह राज्यभरातील वृत्तपत्र लेखक, निवृत्त आणि सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक, शिक्षक, साहित्यिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, मराठी भाषाप्रेमी यांच्यासाठी विनामूल्य पत्र स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी दिली. कोणत्याही शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला किमान मातृभाषेत लिहिता-वाचता यावे ही संकल्पना अस्तित्वात राहिली नसल्याचे विदारक चित्र एका अहवालातून महाराष्ट्रात समोर आले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या मुलांचे मराठी वाचता येत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अशा स्थितीत कोसकोसावर बदलणाऱ्या महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषांनी आपली मराठी भाषा समृद्ध झाली आहे. खेड्यापाड्यातील मराठी भाषा रांगडी अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते, कशीही असली, तरी ती मराठी म्हणूनच मराठी माणसाला आवडते. मराठी भाषेची सद्यःस्थिती आपापल्या बोलीभाषेत व्यक्त करून स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी ६०० शब्दांत लेख लिहावा यावा, अशी अपेक्षा आहे. स्व-बोलीभाषा म्हणजे अस्सल कोल्हापुरी, चंदगडी, आगरी, नागपुरी, मराठवाडी, अहिराणी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांगी,, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी बाणकोटी, कोकणी, वऱ्हाडी, सोलापुरी किंवा महाराष्ट्रात इतर असलेल्या अपेक्षित आहेत.
पहिल्या ३ जणांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र व इतरांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. युनिकोड फॉँटमध्ये टाइप करून दि. २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत लेख chalval1949@gmail.com या ईमेलवर पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहिती, नियमावली व आगाऊ नोंदणी करण्यासाठी स्पर्धा समन्वयक दत्ताराम गवस (९२२०६१५२४५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर आणि पार्थ फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

