गझलेच्या आत्म्याच्या शोध घेणे गरजेचे : डॉ. सुरेश जोशी

रत्नागिरी : गझल संतकाळापासून प्रचलित असल्याने गझलेचा इतिहास मोठा आहे. काही वाटणे हा गझलेचा गाभा आहे. चांगली गझल तयार होण्यासाठी गझलेच्या आत्म्याचा शोध घेणे, गझलेच्या अंतरंगात शिरणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन देवरूख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि समीक्षक डॉ. सुरेश जोशी यांनी केले.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा सौ. नमिता कीर यांची संकल्पना आणि संपादन असलेल्या रत्नागिरीतील २५ गझलकारांच्या गझलांचा समावेश असलेल्या संवाद प्रकाशनाच्या ‘रत्‍नागिरीची गझलरत्ने’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पटवर्धन हायस्कूलच्या कॅ. सुभाषचंद्र ठाकूर सभागृहात हा समारंभ झाला. यावेळी सौ. नमिता कीर, कोमसाप जिल्हाध्यक्ष नंद शेलार, गझलकार वीदास पाटील, संजय कुळ्ये उपस्थित होते.

यावेळी सौ. कीर म्हणाल्या, गझलेला प्रवास २५० वर्षांचा आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर वासुदेव सरदेसाई हे आद्य गझलकार आहेत. नंतर रत्नागिरी जिल्ह्यात हळूहळू गझल रुजायला सुरुवात झाली. आज आपण २५ गझलकारांचा संग्रह प्रकाशित करत आहोत, पण भविष्यात आपण १०० गझलकारांचा समावेश असलेला संग्रह प्रकाशित करू.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील गझलकारांचा तसेच पुस्तकाची निर्मिती करणारे कोकण मीडियाचे प्रमोद कोनकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ गझलकार देविदास पाटील यांनी केले, तर ओघवते सूत्रसंचालन विनय परांजपे यांनी केले.

समारंभाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रमुख विश्वस्त रमेश कीर, डॉ. दिलीप पाखरे, नलिनी खेर, सौ. तेजा मुळ्ये, सौ. सुनेत्रा जोशी, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अनेक सदस्य तसेच गझलप्रेमी उपस्थित होते. प्रकाशन समारंभानंतर नामवंत गझलकारांच्या गझल मुशायर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply