आचरे येथील केंद्रप्रमुख सुगंधा केदार गुरव सेवानिवृत्त; शिक्षकवर्गाकडून शुभेच्छा

आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) : आचरे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या सुगंधा केदार गुरव ३६ वर्षांहून अधिक वर्षांच्या सेवेनंतर ३१ मार्च २०२४ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्या निमित्ताने ‘केंद्र शाळा आचरे क्रमांक एक’ येथे शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वर्गाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या वेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मंगेश मेस्त्री, माता पालक संघ उपाध्यक्ष शमा शेख, माजी उपाध्यक्षा सुरेखा सामंत, मुख्याध्यापक चंद्रकांत माने, पांडुरंग कोचरेकर, आबा भाटकर, हरीश गुरव, नारायण मेस्त्री आणि शिक्षक उपस्थित होते. या वेळी संघटना प्रतिनिधी नवनाथ भोळे, मंगेश कांबळी आदींनी शुभेच्छा देऊन श्रीमती गुरव यांच्याविषयी आदर व्यक्त केला. सर्वांच्या शुभेच्छांना उत्तर देताना श्रीमती सुगंधा गुरव यांनी थोडक्यात आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्या म्हणाल्या, ‘विद्यार्थिदशेपासून शिक्षणाविषयी आणि शिक्षकी पेशाबद्दल आदर असल्याने मी या शिक्षकी पेशाकडे वळले. माझे बालवाडीपासूनचे शिक्षण याच आचरे क्रमांक एक या शाळेत झाले आणि आता शिक्षकी पेशातून सेवानिवृत्तही या शाळेतूनच होत आहे, याचे मला समाधान वाटते. जीवनात लाभलेल्या असंख्य गुरुजनांनी माझ्यावर संस्कार केले. ते सर्व गुरुजन वंदनीय आहेत. मला माझे विद्यार्थी, शिक्षक आणि सहकाऱ्यांनी, तसेच अधिकारी वर्गाने खूप सहकार्य केले. आदरणीय सुरेश ठाकूर गुरुजी, फर्नांडिस गुरुजी, सौदागर बाई, पावसकर बाई, टिळक बाई, फणसेकर बाई, पाडावे गुरुजी हे माझे प्राथमिक शाळेतील शिक्षक. त्यांनी मला घडवले. सर्व प्रकारचे ज्ञान दिले, उत्तम संस्कार रुजवले. चांगले तेवढे घ्यावे आणि प्रामाणिकपणे वागावे, कोणाचा अपमान करू नये, अशी शिकवण आई-वडिलांनी दिली. श्री रामेश्वराच्या कृपेने ३६ वर्षे तीन महिने आणि ११ दिवस इतकी प्रदीर्घ सेवा उत्तम प्रकारे केली. याचा निश्चितच अभिमान आहे.’

शिक्षक वर्गाने श्रीमती गुरव यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. अखिल भारतीय शिक्षक समितीचा आचरे प्रभाग, तसेच आचरे उर्दू शाळेतर्फेही त्यांना पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा देण्यात आल्या. कपिल गुरव यांनी त्यांना भेटवस्तूंसह शुभेच्छा दिल्या. श्रीमती गुरव यांचे चिरंजीव हरीश यांनी त्यांचे लाडके दैवत असलेल्या श्रीकृष्णाची मूर्ती भेट दिली. आचरे केंद्रातील प्रत्येक शाळेच्या शिक्षकांनी भावना व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण आडे आणि श्रीमती अमृता मांजरेकर यांनी केले. आभारप्रदर्शन संतोष आचरेकर आणि रामकृष्ण रेवडेकर यांनी केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply