आचरे येथील रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरात ८ मे रोजी अक्षरोत्सव

मालवण : लवकरच शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या आचरे (ता. मालवण) येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरात ८ मे २०२४ रोजी अक्षरोत्सव हा वाङ्मयीन कार्यक्रम होणार आहे.

आचरे गावचे सांस्कृतिक भूषण तथा वाचनालयाचे १६ वर्षे उपाध्यक्ष तथा १७ वर्षे अध्यक्षपद भूषविलेले कै. श्रीकांत रघुनाथ सांबारी यांचा प्रथम स्मृतिदिन ८ मे २०२४ रोजी आहे. त्यानिमित्त या अक्षरोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अक्षर सोहळा दुपारी ३:३० ते ५:३० या वेळेत होणार आहे.

प्रतिवर्षी याच पुण्यदिनी वाचन आणि लेखन संस्कृतीच्या जपणुकीसाठी ‘अक्षर महोत्सवाचे’ आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी गोपाळ भिसळे यांनी दिली. कार्यक्रमाची रूपरेषा विशद करताना कार्यवाह अर्जुन दत्तात्रय बापर्डेकर म्हणाले, अक्षरपूजन, अक्षरदान, अक्षरगौरव असे विविध वाङ्मयीन उपक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षी मातृभाषा संवर्धन आणि जपणुकीसाठी लेखन, वाचन, भाषण आणि संभाषण या भाषिक कौशल्यांच्या जोपासनेसाठी विविध उपक्रमांचे आम्ही आयोजन करणार आहोत.”

यावर्षी कोमसाप मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांचा ‘आनंद अक्षरांचा’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार असून त्याच वेळी विविध क्षेत्रातील सोळा मान्यवरांच्या हस्ते वाचनालयासाठी ‘अक्षरदान’ होणार आहे.

रामेश्वर वाचन मंदिरामध्ये कार्यकारिणी, सांस्कृतिक समितीची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कार्यक्रमाचे स्वरूप ठरविण्यात आले. बैठकीला प्रमुख मार्गदर्शक कार्यक्रम संयोजक सुरेश ठाकूर यांचे समवेत अशोक कांबळी (उपाध्यक्ष), जयप्रकाश परुळेकर, वैशाली सांबारी, उर्मिला सांबारी, भिकाजी कदम, दीपाली कावले आदी कार्यकारिणी सदस्य, श्रीमती विनिता कांबळी (ग्रंथपाल), स्वप्नील चव्हाण आदी कर्मचारी तसेच कामिनी ढेकणे, भावना मुणगेकर, विलास आचरेकर हे सांस्कृतिक समिती सदस्य उपस्थित होते. मंदार श्रीकांत सांबारी यांनी अक्षर महोत्सवा च्या आयोजनाबद्दल रामेश्वर वाचन मंदिराच्या कार्यकारिणीचे आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply