वेदमूर्ती आठल्ये गुरुजी आणि फडकेशास्त्रींच्या स्मृतिप्रीत्यर्थ रत्नागिरीत तीन मार्चपासून विशेष कार्यक्रम

रत्नागिरी : वेद आणि शास्त्र या विषयातील रत्नागिरी जिल्ह्यातील दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरीच्या संस्कृत पाठशाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. वैदिक मार्तंड व वैदिक शिरोमणी वे. मू. कै. विनायक सीताराम आठल्ये गुरुजी आणि व्याकरणाचार्य कै. पु. ना. फडकेशास्त्री यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फाल्गुन शुद्ध चतुर्थी ते फाल्गुन शुद्ध अष्टमी शके १९४६ (३ मार्च ते ७ मार्च २०२५) या कालावधीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे यंदा चौथे वर्ष आहे.

या कालावधीत दररोज सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा या वेळेत तेंडोलीतील घनपाठी वेदमूर्ती वल्लभ भास्कर मुंडले गुरुजी यांच्या वाणीतून ऋग्वेद संहिता पारायण होणार आहे. या कालावधीत दररोज सायंकाळी चार ते सहा आणि सव्वासहा ते रात्री आठ या वेळेत आळंदी येथील अनंतशास्त्री मुळ्ये यांचे ‘शिवपुराण’ या विषयावर निरूपण होणार आहे.

समारोपाच्या दिवशी, शुक्रवारी सात मार्च रोजी सायंकाळी सात वाजता पुण्यातील घनपाठी वेदमूर्ती प्रकाशशास्त्री ना. दंडगे गुरुजी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम रत्नागिरीतील संस्कृत पाठशाळेत होणार आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन आठल्ये गुरुजी आणि फडकेशास्त्री यांचे सर्व माजी विद्यार्थी आणि स्मृती समिती सदस्यांतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : रविशंकर पंडित – 9049969702; अरुण भोळे – 9370418416

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply