नारायण धारप यांच्या कादंबऱ्यांमध्ये समतोल – अ‍ॅड. विलास कुवळेकर

देवरूख : नारायण धारप यांनी कादंबरी कधीही कंटाळवाणी होऊ न देण्याचा समतोल साधला, असे मत ज्येष्ठ विधीज्ञ, कवी, लेख ॲड. विलास कुवळेकर यांनी व्यक्त केले.

देवरूख येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयात नारायण गोपाळ धारप यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने ‘भयसम्राट नारायण धारप’ या विषयावर ॲड. कुवळेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाचा स्थापना दिन आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने आयोजित केलेल्या व्याख्यानाचे तिसरे पुष्प ॲड. कुवळेकर यांनी गुंफले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि लेखक स्व. नारायण धारप यांच्या प्रतिमापूजनाने मान्यवरांनी केली. ॲड. कुवळेकर यांचा सत्कार अध्यक्ष प्रा. जी. के. जोशी यांनी केला. यानंतर ‘उत्कृष्ट वाचक’ म्हणून मारुती भस्मे, दत्तात्रय पत्की आणि सौ. सेजल गुरव यांना मान्यवरांनी सन्मानित केले.

ॲड. विजय कुवळेकर यांनी ‘भयसम्राट नारायण धारप’ यांच्या साहित्याचा आढावा घेण्याअगोदर, त्यांचा व्यक्तिगत परिचय करून दिला. यानंतर त्यांनी भयकथेमधील एक छोटा उतारा वाचून धारप यांच्या लिखाणामधील कौशल्य उदाहरणासहित सांगितले. लेखकाने केलेल्या विविध कादंबऱ्यांमधील वर्णनामुळे रात्रीच्या वेळी खोलीत एकटा वाचक असताना कधी वाचण्याचे धैर्य दाखवत नसल्याचा गमतीदार किस्सा सांगितला.

ॲड. कुवळेकर यांनी धारप यांच्या चंदनवाडी, अघोरी कावा, चेटकीण, स्वाहा, सीमेपलीकडून, सुवर्णाचे विश्व, शिवराम, ४४० चंदनवाडी, अकल्पित, अघटित, अंधार मात्रा, अनोळखी दिशा, रक्तपिपासू, केशव गढी, भुकेली रात्र आणि वेडा विश्वनाथ अशा विविध कादंबऱ्या व कथांचा याप्रसंगी ऊहापोह केला. ‘लुचाई’सारख्या कादंबरीतील रक्तपिपासू खलनायक रंगवताना त्यांनी साधलेला समतोल अ‍ॅड. कुवळेकर यांनी समजावून दिला. ‘अनोळखी दिशा’ या पुस्तकातील कथांचा उल्लेख करून त्या कथांमधील विविध रोचक पात्रांची माहिती दिली. धारप यांच्या कथेतील समर्थ नावाचा नायक, एखादा वेडा माणूस अशा साहित्यातील समान दुवे त्या कथांमध्ये ओळखीचे नाते सुरुवातीलाच जुळत असल्याचे प्रतिपादन ॲड. कुवळेकर यांनी केले. स्व. लेखक नारायण धारप यांनी भयकथेबरोबर काही रहस्यमय कथा लिहिल्या. त्यांचाही आढावा यावेळी त्यांनी घेतला.

सुमारे दोन तास चाललेल्या आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात अमोघ वाणीने लेखक धारप यांच्या भयकथांची माहिती ॲड. कुवळेकर यांनी करून दिली. अलीकडे कादंबरी वाचनापासून दूर चाललेल्या आजच्या समाजाला अशा व्याख्यानामुळे परत काहीतरी वाचावेसे वाटेल. हीच माझी इच्छा असल्याचे ॲड. कुवळेकर यांनी सांगून व्याख्यानाचा समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ. श्रद्धा आमडेकर यांनी, तर आभार प्रदर्शन सौ.अनघा लिमये यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply