रत्नागिरी : येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टचा यावर्षीचा एक कर्तव्यनिष्ठा पुरस्कार आणि ५ कार्यगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यावर्षी सर्व पुरस्कार कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
गेली १३ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती किंवा विशेष कार्य करणाऱ्या असाधारण व्यक्ती आणि समाजसेवी संस्था यांना विविध पुरस्कार बोडस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिले जातात. यावर्षीचे कर्तव्यनिष्ठा व कार्यगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, शाल आणि एक पुस्तक असे आहे, तर कार्यगौरव पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, शाल, पुस्तक आणि ३ हजार रुपये असे आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील ४ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रथमच एका वर्षी सर्व पुरस्कार कर्मचारी प्रवर्गात कार्यरत व्यक्तींना देण्यात येत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील कुवारबाव येथील जागुष्टे हायस्कूल येथे प्रथम ५ वर्षे विनाअनुदानित आणि नंतर अनुदानित तत्त्वावर ३३ वर्षे अशी सुमारे ३८ वर्षे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करणारे रवींद्र भिवा शिंदे (रवींद्रनगर, कारवांची वाडी) यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गुहागर येथील श्री दुर्गादेवी देवस्थान येथे १५ वर्षे व्यवस्थापिका पदावर कार्यरत असलेल्या शलाका चंद्रशेखर खरे ( वरचा पाट) , दिव्यांग असूनही जवळपास ३० वर्षे हातखंबा तिठा येथे दोन प्रकारच्या सेवा देऊन निवृत्त झालेले प्रभाकर कमलाकर घवाळी (तारवेवाडी हातखंबा), गाडीतळ येथील जनसेवा ग्रंथालयात लिपिक आणि गेली २० वर्षे शब्दांकुर या हस्तलिखित दिवाळी अंकात एकहाती पुनर्लेखन करणाऱ्या सुजाता मधुकर कोळंबेकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे (ता. कणकवली) या ग्रामीण भागात गेल्या १९ वर्षांत १७०० पेक्षा जास्त व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह केलेले निकेत नरहरी पावसकर (कनिष्ठ लिपिक, कासार्डे विद्यालय) यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार प्राप्त ५ व्यक्तींपैकी रत्नागिरी तालुक्यबाहेरील २ सन्मानितांना त्यांचे सन्मानपत्र, पुस्तक शाल तसेच पुरस्काराची रक्कम त्यांच्या कार्याच्या ठिकाणी रजिस्टर पोस्ट आणि बँकेद्वारे दिली जाणार आहे. कुवारबाव येथील रवींद्र भिवा शिंदे , रत्नागिरी शहरातील सुजाता मधुकर कोळंबेकर आणि हातखंबा येथील प्रभाकर कमलाकर घवाळी यांचा गौरव ७ मार्च ते ९ मार्च २०२५ या कालावधीत त्यांच्या कामाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे, असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲडव्होकेट सौ. आदिती अभिजित पटवर्धन यांनी कळवले आहे.
गौरवमूर्तींचा परिचय
कर्तव्यनिष्ठा पुरस्कार
रवींद्र भिवा शिंदे :- द न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कुवारबाव येथील जागुष्टे हायस्कूल येथे गेली ३८ वर्षे सेवक पदावर कार्यरत आहेत. पहिली ५ वर्षे विनाअनुदानित तत्त्वावर संस्थेच्या पगारावर काम केल्यानंतर १९९१ पासून गेली ३३ वर्षे शासनमान्य पदावर काम करत आहेत. या काळात एकूण ६ मुख्याध्यापक, अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबत काम करताना सांगितलेल्या वेळेपूर्वी हजर राहणे, घड्याळाकडे न बघता कामे पूर्ण करणे, शाळेच्या सहलीसोबत ७-८ दिवस दक्षिण – उत्तर आणि पश्चिम भारतात जाणे अशी सेवा केली आहे. त्यांच्या सेवाकाळात त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही, हे विशेष आहे. त्याशिवाय त्यांनी कोविड काळात विशेष सेवा बजावली . शासनाच्या पाठ्यपुस्तक वितरण कार्यात सक्रिय सहभाग घेतला आणि डी. टी. एड. परीक्षा काळात रात्रपाळी सेवक म्हणून शासनाचे सन्मानपत्र प्राप्त झाले आहे. (संपर्क क्रमांक ७७९८०७१३४४)
कार्यगौरव पुरस्कार
श्रीमती शलाका चंद्रशेखर खरे – गुहागर येथील श्री दुर्गादेवी देवस्थान येथे १५ वर्षे व्यवस्थापिका पदावर कार्यरत आहेत. मंदिरातील भक्तनिवास – भोजनगृह, गोशाळा यांची देखरेख करताना येणाऱ्या भाविकांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य करतात. मंदिरातील सर्व वार्षिक आणि विशेष उपक्रमात विश्वस्त आणि पदाधिकारी यांना लागेल ती मदत करतात. ज्ञानरश्मी वाचनालय आणि लायन्स क्लब ऑफ गुहागर यांनी पुरस्काराने सन्मानित केले आहे.. (संपर्क क्रमांक ७३५०७३३९११ )
प्रभाकर कमलाकर घवाळी – दिव्यांग असून जवळपास ३० वर्षे हातखंबा तिठा येथे दोन प्रकारच्या सेवा देऊन स्वाभिमानाने जगताना एक आदर्श निर्माण केला आहे. मे. दामोदर शिवराम आणि कंपनीच्या पेट्रोल पंपावर प्रथम एस. टी.डी. बूथ चालवला. नंतर हा व्यवसाय बंद झाल्यावर पंपावर येणाऱ्या वाहनात हवा भरण्याचे काम केले. त्यासाठी दोन पाळ्यांमध्ये काम केले. यासाठी एक खास चाकांची ट्रॉली करून दिली होती. रात्रपाळीच्या कामात काही अडचणी आल्याने शेवटी जनरल पाळीत काम केले. यासाठी पत्नी प्रतीक्षा , पंप व्यवस्थापक विलास काळे आणि मालक दीपक गद्रे यांचे ते ऋणी आहेत. सध्या निवृत्त असून निवळी तिठा येथे पानाची गादी चालवतात (संपर्क क्रमांक ८९७५३१०७१७)
सुजाता मधुकर कोळंबेकर – सुरुवातीला मूकबधीर विद्यालय आणि आविष्कार या मतिमंदांसाठी कार्यरत संस्थेत प्रत्येकी एकेक वर्ष अशी २ वर्षे अस्थायी तत्त्वावर काम केल्यावर जनसेवा ग्रंथालयात लिपिकपदावर काम सुरू केले. ग्रंथालयाच्या शब्दांकुर या हस्तलिखित दिवाळी अंकात सुरुवातीला इतरांच्या सोबत पुनर्लेखन केल्यावर गेली २० वर्षे एकहाती हे हस्तलिखित दिवाळी वार्षिक सांभाळत आहेत. मान्यवर लेखकांनी दिलेले लिखाण वाचून, समजून घेऊन त्याचे लेखकाला अभिप्रेत पुनर्लेखन करणे हे अवघड काम आपली नोकरी सांभाळून बिनचूक आणि दिलेल्या कालावधीत पूर्ण करतात. (संपर्क क्रमांक ९५५२२८०३४८)
निकेत नरहरी पावसकर – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. २००६ साली विंदा करंदीकर यांच्या पोस्ट कार्डाने मान्यवरांच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रसंग्रह हा उपक्रम सुरू केला. कणकवली तालुक्यातील तळेरे या ग्रामीण ठिकाणी सध्या मराठी, हिंदी, संस्कृत, कोकणी, उर्दू, इंग्रजी, चायनीज, ब्राह्मी, मोडी आणि ब्रेल लिपीतील १७०० पेक्षा जास्त व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेशपत्र संग्रह केला आहे. गेल्या १९ वर्षांत ५ हजारांपेक्षा जास्त लोकांशी स्वखर्चाने संपर्क साधला आहे. अक्षरोत्सव ऊर्फ अक्षरघर या संग्रहाला विविध मान्यवरांनी भेट दिली असून त्या संग्रहाच्या प्रदर्शनाच्या उत्पन्नातील २० टक्के वाटा सामाजिक कार्यासाठी खर्च करतात. (संपर्क क्रमांक ९८६०९२७१९९ )
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

