प्रशांत परांजपे यांना कोलंबो विद्यापीठाची मानद डॉक्टरेट प्रदान

दापोली : जालगाव (ता. दापोली) येथील पर्यावरणप्रेमी प्रशांत परांजपे यांना पर्यावरण क्षेत्रातील शाश्वत विकासाबद्दल कोलंबो विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी पुण्यात विशेष समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.

श्री. परांजपे २००१ पासून पर्यावरण क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी पर्यावरण संवर्धनामध्ये विविध उपक्रम सातत्याने सुरू ठेवले आहेत. काही नवीन संकल्पनांच्या अनुषंगाने परांजपे यांनी यशोगाथाही निर्माण केल्या आहेत. त्यांनी जलसंवर्धन आणि वृक्षसंवर्धन या विषयात काम करताना एक रोप दोन खड्डे, मातीविरहित मचाण शेती, पालापाचोळा न जाळता खत निर्मिती असे यशस्वी प्रयोग केले आहेत. कचरा या विषयात काम करताना ई-वेस्टपासून स्वागत कक्षाची निर्मिती, प्लास्टिक बाटल्यांपासून हँगिंग, बुके, बाकडी व स्टूल आणि फुटपाथची निर्मिती, इकोफ्रेंडली गुढीची निर्मिती, सागराच्या पाण्यापासून हरितक्रांती, सर्व प्रकारच्या कचऱ्याच्या विघटनाला सशक्त मार्ग, ओल्या कचऱ्यापासून घरच्या घरी खत निर्मिती, वृक्ष वाढदिवस, वणवामुक्त गाव योजना, गावात पाझर खड्डे आणि लाखो लिटर पाणी जिरवणे, पर्यावरण पूरक गणेशमूर्ती निर्मिती अशा अनेक यशस्वी संकल्पना साकारल्या आहेत.

श्री.परांजपे यांचे निवेदिता प्रतिष्ठान या त्यांच्या पर्यावरणविषयक संस्थेच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यांत काम सुरू आहे. ते रत्नागिरी जिल्हा परिषदेत जलसंपदा विभागात जलप्रेमी म्हणू न काम करित आहेत. त्याचप्रमाणे जलशक्ती अभियान आणि पाणी व स्वच्छता मिशन या विभागातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करण्याचे कार्य २०१२ पासून सातत्याने करीत आहेत. पर्यावरणविषयक महाराष्ट्र फेडरेशन या संस्थेचे प्रमुख समन्वयक म्हणून गेली अनेक वर्षे काम करीत आहेत .पर्यावरणाविषयी “सुगंध वसुंधरा रक्षणाचा” हे त्यांचे पुस्तक प्रकाशित आहे. अनेक मासिके व दैनिकांमधून पर्यावरणासंदर्भात सातत्याने स्तंभलेखन, लेखमालिकेच्या माध्यमातून जनप्रबोधन सुरू असते. जालगाव ग्रामपंचायतीत माझी वसुंधरा अभियानाचे प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. आतपर्यंत त्यांना अनेक राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

प्रशांत परांजपे यांच्या पर्यावरण कार्याची दखल घेऊनच कोलंबो विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply