दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीचा झेंडा; डॉ. तेजानंद गणपत्ये आणि प्रसाद देवस्थळींनी यशस्वीरीत्या पूर्ण केली स्पर्धा

रत्नागिरी : दक्षिण आफ्रिकेत आज (रविवारी, ८ जून) पार पडलेल्या जागतिक कीर्तीच्या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीचे प्रसाद देवस्थळी आणि चिपळूणचे डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी यशस्वी सहभाग नोंदवून रत्नागिरीचा झेंडा फडकवला. सुमारे ९० किलोमीटर अंतराची ही अल्ट्रा मॅरेथॉन या दोघांनीही सुमारे ११ तास ३० मिनिटांत पूर्ण केली. प्रसाद देवस्थळी हे १३ जून रोजी रत्नागिरीत दाखल होणार असून, त्यांचा नागरी सत्कार रत्नागिरीकरांच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे.

कॉम्रेड्स मॅरेथॉन ही जगातील सर्वांत जुनी व प्रतिष्ठित अल्ट्रा मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते. स्पर्धेचे यंदाचे हे ९८ वे वर्ष होते. पिटर्समारीबर्ग ते डर्बन हे सुमारे ९० किलोमीटरचे अंतर १२ तासांच्या मर्यादेत पार करणे ही या स्पर्धेची अट होती. ५ अंश सेल्सियसपासून २२ अंश सेल्सिअसपर्यंतच्या बदलत्या तापमानात, खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून आणि अनेक चढ-उतार, अडथळे पार करत प्रसाद देवस्थळी आणि डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी कर्करोगावर मात केलेली असून, त्यांनी यापूर्वी दोन वेळा ‘आयर्नमॅन’ किताब पटकावला आहे. ही फिटनेसचा कस पाहणारी स्पर्धा असते. सायकलिंगमध्येही त्यांनी ‘सुपर रँडोनेअर’ हा मानाचा किताब मिळवला आहे.

प्रसाद देवस्थळी हे संगमेश्वर तालुक्यातील धामापूर गावचे सुपुत्र. ‘धावनगरी रत्नागिरी’ अशी ओळख प्रस्थापित करणारे देवस्थळी हे केवळ मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजक नाहीत, तर स्वतःही देशभरातील विविध मॅरेथॉन आणि अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नियमितपणे भाग घेत असतात. यंदा प्रथमच त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता ही स्पर्धा सुरू झाली आणि मजल दरमजल करत त्यांनी ती पूर्ण केली. सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक तसेच कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजक असलेल्या देवस्थळी यांचे लाइव्ह लोकेशन अनेक जण पाहत होते. सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदनाचे संदेश सातत्याने येत आहेत. देवस्थळी यांचे भव्य स्वागत करण्यात येणार असून, त्यात त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे कार्यकर्ते आणि शहरातील धावपटू सहभागी होणार आहेत. रत्नागिरीतून या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारे प्रसाद देवस्थळी हे बहुधा पहिलेच धावपटू असावेत. त्यामुळे त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply